या प्रकरणी पोलिसांनी गणेश ओंकारराव शिंदे आणि त्याचा मुलगा अमोल गणेश शिंदे या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून २७ लाखांपैकी तब्बल २५ लाख २ हजार ४८० रुपये जप्त करण्यात आले आहेत.
नेमका काय होता प्रकार?
उस्मानपुरा भागात दोन दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या लूटमारीची एक धक्कादायक घटना घडली होती. एका व्यक्तीच्या डोळ्यात मिरची पूड फेकून कटरने वार करून त्याच्याकडील २७ लाख रुपयांची बॅग हिसकावून चोरटे पसार झाले होते. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती.
advertisement
चालकानेच आखला कट
मात्र, घटनेच्या १२ तासांत उस्मानपुरा पोलिसांनी तपास चक्रे फिरवत या प्रकरणाचा छडा लावला. ज्या चालक गणेश ओंकारराव शिंदे यांच्या हातातील बॅग लुटली गेली होती, त्यांनीच हा सर्व बनाव रचल्याचे उघड झाले. गणेश शिंदे हे मागील १८ वर्षांपासून त्यांच्या मालकाच्या कंपनीत चालक म्हणून नोकरी करत होते. मात्र, ते मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाले होते. तसेच, लवकरच त्यांना नोकरी सोडायची असल्याने, 'जाण्यापूर्वी अखेरचा हात मारावा' या उद्देशाने त्यांनी ही रक्कम लुटण्याचा कट आखला.
या कटात त्यांनी आपला मुलगा अमोल गणेश शिंदे याला सामील केले. बाप-लेकाने मिळून ही रक्कम लुटण्याचा आणि 'लूट झाल्याचा' बनाव करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अत्यंत जलद गतीने तपास करून या बाप-लेकांना अटक केली. पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून लुटलेली बहुतांश रक्कम जप्त केली असून पुढील तपास उस्मानपुरा पोलीस करत आहेत.
