बापूसाहेब पठारे असं गुन्हा दाखल झालेल्या शरद पवार गटाच्या आमदाराचं नाव आहे. ते वडगाव शेरीचे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. लोहगाव येथे रस्त्याच्या कामावरून सुरू असलेल्या जनआक्रोश आंदोलनाच्या वादातून मारहाण आणि साडेतीन लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या साखळीची चोरी केल्याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात बंडू शहाजी खांदवे (वय ४९) यांनी तक्रार दिली आहे. संबंधित तक्रारीवरून आमदार बापूसाहेब पठारे, शकील शेख, महेंद्र आवा पठारे, सुरेंद्र बापूसाहेब पठारे, रवींद्र बापूसाहेब पठारे, किरण बाळासाहेब पठारे, सागर नारायण पठारे, सचिन किसन पठारे आणि रूपेश मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापूर्वी आमदार पठारे यांनी केलेल्या तक्रारीवरून खांदवे आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता हा परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
काय आहे प्रकरण?
लोहगाव येथील गाथा लॉन्स येथे ४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही मारहाणीची घटना घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. लोहगाव भागात ३१ कोटी ५० लाख रुपये मंजूर होऊनही रस्त्याचे काम थांबल्याने तसेच खराब रस्त्यांमुळे शाळकरी मुलगी आणि एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत फिर्यादी खांदवे यांनी ५ ऑक्टोबर रोजी जनआक्रोश आंदोलन आयोजित केले होते.
या आंदोलनाची व्हॉट्सअॅप पोस्ट आमदार बापूसाहेब पठारे यांच्याकडे पोहोचल्यानंतर वाद सुरू झाला. 'बापूसाहेब पठारे यांनी घटनास्थळी येऊन खांदवे यांना शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्यांच्या गळ्यातील साडेतीन लाख रुपयांची सोनसाखळी चोरली,' असे तक्रारीत म्हटले आहे. जखमी खांदवे यांनी ९ ऑक्टोबर रोजी रुग्णालयातून आपला जबाब नोंदवला. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.