महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सूत्रधार वाल्मिक कराडला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. कराडने जामिनासाठी केलेला अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला आहे, त्यामुळे आता त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. खंडणी प्रकरणातून ही हत्या झाल्याचा आरोप देशमुख यांच्या कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणाने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली होती. या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचं चौकशीदरम्यान समोर आलं त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.
advertisement
सुप्रीम कोर्टापर्यंतचा लढा, कुटुंबियांना दिलासा
वाल्मिक कराड याने यापूर्वी जिल्हा न्यायालय आणि हायकोर्टातही जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य आणि उपलब्ध पुरावे पाहता त्याचे अर्ज फेटाळण्यात आले होते. अखेर कराडने सुप्रीम कोर्टात जामिनासाठी दाद मागितली. त्याला वाटलं तिथे त्याला जामीन अर्ज मिळेल मात्र तिथेही सुप्रीम कोर्टाने जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळून लावला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी आणि समर्थकांनी समाधान व्यक्त केले आहे. हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला कोणत्याही परिस्थितीत सवलत मिळू नये, अशी मागणी कुटुंबियांकडून केली जात होती.
