गडचिरोली जिल्ह्यात पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अशातच पुरात वाहून जाणाऱ्या इसमाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. हरिदास बावनथडे (वय 60) असं इसमाचे नाव आहे. हा प्रकार कुरखेडा तालुक्यातील सोनेरांगी परिसरातल्या कढोली नाल्यावर उघडकीस आला. जिल्ह्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. सोनेरांगी येथील हरिदास बावनथडे हा इसम कढोली नाला पार करत असताना जोरदार लोंढ्याने वाहून गेला.
advertisement
ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली. सुमारे दोन किलोमीटर दूरवर झाडाला पकडून राहिल्याने त्याचा जीव वाचला. गावातील नागरिकांनी तातडीने धाव घेत शोधमोहीम राबवत दोराच्या सहाय्याने त्याची अथक प्रयत्नाने सुटका केली. जिल्हा प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही नागरिकांनी जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून वाट काढणे सुरूच ठेवल्याने असे प्रसंग ओढवत आहेत.
हेलिकॉप्टरमधून अंगणवाडी सेविकेला रुग्णालयात पोहोचवलं
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात भामरागडच्या पुरामुळे उपचारासाठी जाऊ न शकलेल्या गंभीर प्रकृती बिघडलेल्या अंगणवाडी सेविकेच्या मदतीसाठी गडचिरोली पोलीस धावून गेले असून पोलिसांच्या हेलिकॉप्टर मधून महिलेला उपचारासाठी गडचिरोलीला तातडीने नेण्यात आलं आहे. आरेवाडा येथील अंगणवाडी सेविका सीमा बांबोडे यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना उपचारासाठी तातडीने गडचिरोली पाठवणे आवश्यक होतं. मात्र भामरागडच्या पुरामुळे संपर्क तुटलेला होता अशा अवस्थेत अंगणवाडी सेविकेला तातडीने गडचिरोलीला पोहोचवण्यासाठी गडचिरोली गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिलं. सीमा बांबोळे यांना भामरागड येथून थेट हेलिकॉप्टरमधून गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गडचिरोली पोलिसांच्या तत्परतेमुळे अंगणवाडी सेविका सीमा बांबोडे यांचा जीव वाचवण्यासाठी मदत झाली आहे.
