समोर आलेल्या माहितीनुसार, सकाळी डिटोनेटर तयार करण्याच्या अंतिम टप्प्यातील ‘क्रिम्पिंग’ प्रक्रियेच्या वेळी अचानक स्फोट झाला. एसबीएल कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कामगार नॉन-इलेक्ट्रिक प्रकारचे डिटोनेटर तयार करत होते. या प्रकारात विद्युत प्रवाहाऐवजी धक्क्यामुळे म्हणजेच ‘शॉक इफेक्ट’मुळे स्फोट होतो. डिटोनेटरमध्ये स्फोटक द्रव्याचे प्रमाण अत्यल्प, म्हणजे मिलिग्रॅममध्ये असते. मात्र उत्पादन प्रक्रियेत तांत्रिक बिघाड किंवा क्षणिक निष्काळजीपणा झाल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
advertisement
इलेक्ट्रिक डिटोनेटरवर बंदी
सरकारने पारंपरिक इलेक्ट्रिक डिटोनेटरवर बंदी घातली असून सध्या उद्योग क्षेत्रात प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक डिटोनेटरचा वापर केला जातो. या प्रकारात स्फोट घडवण्यासाठी विशेष ‘लॉगर’ उपकरण आवश्यक असते. संबंधित कंपनीच्या अधिकृत लॉगरशिवाय हे डिटोनेटर सक्रिय होत नाहीत. एसबीएल कंपनीकडून दोन्ही प्रकारचे डिटोनेटर तयार केले जातात. मात्र आज झालेल्या स्फोटात सहभागी असलेले डिटोनेटर हे औद्योगिक वापरासाठी होते, लष्करी दारुगोळ्यासाठी नव्हते, असेही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
जखमींवर रुग्णालयात उपचार
स्फोटानंतर घटनास्थळी अग्निशमन दल, पोलिस आणि रुग्णवाहिका तातडीने दाखल झाल्या. जखमींना शासकीय आणि खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. काही कामगार गंभीर भाजले गेल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी मदत व बचावकार्याचा आढावा घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
मृतांच्या कुटुंबांना मदतीचा हात
नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या फॅक्टरीतील दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. याशिवाय संबंधित कंपनी सुद्धा आर्थिक मदत त्यांच्या कुटुंबियांना देणार आहे.
सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर
या दुर्घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा धोकादायक उद्योगांमध्ये सुरक्षा उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. मृत कामगारांच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत आणि जखमींवर मोफत उपचार देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
हे ही वाचा :
