कोकणातील सर्वात मोठा शिमगा, रायगडमध्ये पेटते 50 फुटांची भव्य होळी, काय आहे परंपरा?
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
कोकणातील अनेक जिल्ह्यांप्रमाणे रायगड जिल्ह्यातही शिमग्याच्या वेगवेगळ्या परंपरा पाहायला मिळतात. महाडमध्ये एकमेकांवर जळते लाकूड फेकण्याची परंपरा आहे.
रायगड : शिमगा म्हटलं की कोकणाचं नाव आपसूकच पुढे येतं. गणेशोत्सवानंतर चाकरमानी मोठ्या उत्साहाने पुन्हा गावाकडे परततात तो सण म्हणजे शिमगा. कोकणात या सणाला विशेष महत्त्व असून गावागावांत पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली जाते. 2026 साली शिमगा आणि होलिका उत्सव 2 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे.
कोकणातील अनेक जिल्ह्यांप्रमाणे रायगड जिल्ह्यातही शिमग्याच्या वेगवेगळ्या परंपरा पाहायला मिळतात. महाडमध्ये एकमेकांवर जळते लाकूड फेकण्याची परंपरा आहे. या खेळाला देव-दानव युद्ध असे म्हटले जाते. परंपरेचा भाग म्हणून हा खेळ आजही उत्साहात सादर केला जातो.
अशाच प्रकारे तळा तालुक्यातील गिरणे गावातील होळी पंचक्रोशीत मानाची मानली जाते. या गावाची खास ओळख म्हणजे दरवर्षी उभारली जाणारी तब्बल 50 फुटांची भव्य होळी. हीच या गावाच्या शिमग्याची सर्वात मोठी खासियत मानली जाते. पंचक्रोशीत सर्वात उंच होळी म्हणून गिरणे गावाची ओळख आहे.
advertisement
फाल्गुन पंचमीपासून येथे शिमगोत्सवाची सुरुवात होते आणि पंधरा दिवस गावात विविध पारंपरिक कार्यक्रम रंगतात. या काळात नऊ लहान होळ्या पेटवल्या जातात, तर मुख्य होळी शिमग्याच्या दिवशी रचली जाते. मध्यभागी उंच लांबलचक खांब उभारून त्याभोवती लाकूड आणि पालापाचोळा रचला जातो. सुमारे 50 फुटांपर्यंत उंचावलेली ही होळी पेटल्यानंतर ज्वाळा आकाशाकडे झेपावतात आणि संपूर्ण परिसर उजळून निघतो.
advertisement
या परंपरा जपण्यात गावातील तरुण मंडळी आघाडीवर असतात. युवक स्वतः पुढाकार घेऊन होळीसाठी लागणारे लाकूड, आंब्याचे झाड आणि इतर साहित्य गोळा करतात. लाकूड आणताना गीते म्हणत, काठी हातात घेऊन गोल रिंगण धरत नृत्य करत ते आनंद साजरा करतात. त्यामुळे होळीची तयारीही सणासारखीच पार पडते. मुख्य होळीच्या आदल्या दिवशी शंकासुराचा खेळ सादर केला जातो. दोन वाड्यांतील शंकासुर मैदानात उतरतात आणि त्यांच्यातील खेळ पाहण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमतात. त्यानंतर पुरुष स्त्रीवेश धारण करून नृत्य सादर करतात. महिला पारंपरिक गीते म्हणत सहभागी होतात.
advertisement
होळीच्या दिवशी प्रथम ग्रामदेवतेची पालखी काढली जाते. सर्वजण आपल्या इष्ट देवतांना वंदन करतात. पूजा केल्यानंतर विधीपूर्वक ही 50 फुटांची मानाची होळी प्रज्वलित केली जाते. होळी पेटल्यानंतर बोंबा मारण्याची परंपराही पाळली जाते. दरवर्षी उभारली जाणारी ही 50 फुटांची भव्य होळी हीच गिरणे गावाच्या शिमग्याची खरी ओळख ठरली आहे. परंपरा आणि तरुणाईचा उत्साह यामुळे हा शिमगा आजही दिमाखात साजरा होताना दिसतो.
Location :
Raigad,Maharashtra
First Published :
Mar 01, 2026 6:49 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
कोकणातील सर्वात मोठा शिमगा, रायगडमध्ये पेटते 50 फुटांची भव्य होळी, काय आहे परंपरा?







