नेमकी घटना काय घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, कांडली येथील नकुल पावडे हा तरुण २४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून घरातून बेपत्ता झाला होता. नकुलचे वडील संजय पावडे यांनी दोन दिवस (२६ व २७ ऑक्टोबर) त्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तो कुठेही सापडला नाही. अखेर त्यांनी २७ ऑक्टोबर रोजी तामसा पोलीस ठाण्यात आपला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
advertisement
गुप्त माहितीने गूढ उलगडलं
या तक्रारीनंतर तामसा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने नकुलचा कसून शोध सुरू केला. तपासादरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली. त्या माहितीवरून पोलिसांनी गणेश दारेवाड (४०) आणि विशाल दारेवाड (१९) या दोन संशयितांना ताब्यात घेतले. दोघांची कसून चौकशी केली असता दोघांनी हत्येची कबुली दिली.
हत्या करून मृतदेह विहिरीत फेकला
त्यांनी सांगितले की, "प्रेमसंबंधातून आम्हीच नकुल पावडे याचा खून केला आणि त्याचा मृतदेह पोत्यात बांधून भोकर हद्दीतील सुधा नदीजवळ असलेल्या शिंगारवांडी शिवारातील विहिरीत फेकून दिला." गणेश दारेवाड हा मुलीचा वडील तर विशाल दारेवाड हा तिचा भाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तामसा पोलीस ठाण्याच्या पथकाने मंगळवारी (दि. २८) रात्री विहिरीतून नकुल पावडे याचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत मृतदेह शवविच्छेदनासाठी तामसा आरोग्य केंद्रात पाठवला.
संजय शिवाजी पावडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गणेश दारेवाड व विशाल दारेवाड या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बालाजी नरवटे हे करत आहेत. प्रेमसंबंधाच्या वादातून तरुणाची हत्या झाल्याने कांडलीसह तामसा परिसरात खळबळ उडाली आहे.
