या गोड बासुंदीची कहाणी सुमारे 1900 च्या दशकात पुण्यातील रविवार पेठेतील एका वाड्यातून सुरू झाली. रविवार पेठेत वास्तव्य असणाऱ्या शिवराम भुमकर यांनी घरातूनच बासुंदी व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. त्याकाळी दूध, साखर आणि शुद्धतेवर भर देत शिवराम भूमकर हे बासुंदी बनवत.
advertisement
शिवराम भूमकर हे कावडीवर बासुंदी घेत पुण्यातील मध्यभागी असलेल्या पेठांमध्ये घरोघरी जाऊन बासुंदी विकत. पुढे त्यांचा ह्या बासुंदी व्यवसायाचा वारसा त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी जपला आहे. आजही पुण्यातील रविवार पेठेत असलेल्या आप्पा बासुंदीवाले या दुकानात त्याच पद्धतीने आणि घरगुती स्वरूपातील बासुंदी तयार केली जाते. ग्राहकांची मनापासून जपलेली परंपरा पुण्यातील अनेका पिढ्यांनी आप्पा बासुंदीवाले यांच्या बासुंदीची चव अनुभवली आहे. लग्न समारंभ, वाढदिवस, दिवाळी, दसरा आणि इतर सणासुदीच्या काळात या दुकानातील बासुंदीला नेहमीच ग्राहकांची मोठी मागणी असते.
श्रेयश भुमकर यांनी सांगितले की, आप्पा बासुंदीवाले ह्या व्यवसायाची सुरुवात आमच्या पणजोबांनी केली. रविवार पेठेतील जुन्या वाड्यात रोज सायंकाळी बासुंदी बनवून कावडीने आमचे पणजोबा विकायचे. त्याकाळी चाराणे आणि आठाणे एवढ्या दराने बासुंदीची विक्री केली जात असे. मात्र जुन्या काळातील चव जपत आजच्या ग्राहकांच्या अपेक्षेनुरूप स्वच्छता आणि गुणवत्ता आम्ही टिकवून ठेवली आहे.
चौथी पिढी चालवते हा व्यवसाय
आज भूमकर कुटुंबातील चौथी पिढी म्हणजेच श्रेयश भूमकर हे आधुनिकता आणि परंपरा यांचा सुंदर संगम साधत दुकान चालवते. तीच चव, स्वच्छता आणि गुणवत्तेच्या जोरावर आप्पा बासुंदीवाले दुकानातील बासुंदी आजही ग्राहकांच्या पसंतीस पडते. 520 रुपये किलो ह्या भावाने मिळणारी ही गोड बासुंदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
चवीसोबतच भावनिक नातं ही अनेक पुणेकरांसाठी हे फक्त बासुंदीचे दुकान नसून आठवणींचा मोठा खजिना आहे. पूर्वजांनी चाखलेली चव मुलं नातवंडे आता आप्पा बासुंदीवाले यांच्या माध्यमातून चाखत आहेत.