पॅन आणि आधार लिंक
आयकर विभागाने स्पष्ट केले आहे की, ३१ डिसेंबरपर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही हे केलं नसेल, तर उद्या १ जानेवारीपासून तुमचं पॅन कार्ड 'रद्दी' (Inoperative) होईल. त्यानंतर तुम्ही ५० हजार रुपयांपेक्षा जास्त व्यवहार करू शकणार नाही आणि नवीन बँक खातेही उघडू शकणार नाही.
advertisement
बिलेटेड आयटीआर
जर तुम्ही आर्थिक वर्ष २०२४-२५ चा प्राप्तिकर परतावा (ITR) भरण्यास मुकला असाल, तर आज रात्रीपर्यंत तो भरण्याची शेवटची संधी आहे. यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल, पण जर आजची तारीख चुकली तर तुम्ही पुन्हा रिटर्न फाईल करू शकणार नाही आणि आयकर विभागाची नोटीस घरी येऊ शकते.
चुकीचा आयटीआर सुधारण्याची संधी
तुम्ही आधीच आयटीआर भरला असेल, पण त्यात काही माहिती द्यायची राहिली असेल किंवा चूक झाली असेल, तर ती सुधारण्यासाठी आज 'रिवाईज्ड रिटर्न' भरता येईल. यासाठी कोणताही अतिरिक्त दंड लागत नाही, फक्त कराची रक्कम वाढली असेल तर त्यावर व्याज द्यावे लागेल.
आयकर विभागाची नोटीस किंवा एसएमएस
ज्या करदात्यांना प्राप्तिकर विभागाकडून चुकीच्या कपातीबद्दल (Deduction), बोगस देणगीबद्दल किंवा पॅन मिसमॅचबद्दल एसएमएस किंवा ईमेल आले आहेत, त्यांना आपली चूक सुधारून सुधारित आयटीआर भरण्यासाठी आज ३१ डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
टॅक्स रिजीम बदलण्याची शेवटची वेळ
जर तुम्ही आयटीआर भरताना जुनी किंवा नवीन टॅक्स रिजीम निवडण्यात चूक केली असेल आणि ती बदलायची असेल, तर सुधारित परताव्याच्या माध्यमातून आज रात्रीपर्यंतच हे शक्य आहे.
बँक लॉकर एग्रीमेंट
आरबीआयच्या नवीन नियमांनुसार, बँक लॉकर असलेल्या ग्राहकांना सुधारित लॉकर करारावर स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे. जर तुम्ही अजूनही बँकेत जाऊन या कागदपत्रांची पूर्तता केली नसेल, तर तुमचे लॉकर 'फ्रीझ' केले जाऊ शकते.
