“आवड आणि कौशल्य यांचा संगम झाला, की कल्पनाही व्यवसायात रूपांतरित होते,” हे वाक्य खरं आकांक्षा दळवी या तरुण डिझायनरने ठरवलं आहे. दोन वर्षांपूर्वी तिने स्वतःचा ‘Adorn’ या नावाचा ब्रँड सुरू केला आणि त्याद्वारे महिलांसाठी तसंच पुरुषांसाठी युनिक अशा हँडबॅग्स आणि विशेषतः ‘मोबाईल बेल्ट’ हा अनोखा प्रॉडक्ट बाजारात आणला.
advertisement
सोशल मीडियातून सुचलेली कल्पना
आकांक्षाला या मोबाईल बेल्टची कल्पना सोशल मीडियावर व्हिडिओ स्क्रोल करताना आली. चीनमधील एका व्हिडिओमध्ये दाखवलेला बेल्ट पाहून तिच्या मनात विचार आला, “भारतीय स्त्रियांच्या साडी किंवा पारंपरिक ड्रेससोबत वापरता येईल असा बेल्ट का बनवू नये?” कारण बहुतेक वेळा ड्रेस किंवा साडीत खिसे नसल्यामुळे महिलांना मोबाईल ठेवण्यासाठी स्वतंत्र पर्स घ्यावी लागते. हाच दैनंदिन त्रास लक्षात घेऊन आकांक्षाने खास भारतीय पोशाखांना साजेशा डिझाइनमध्ये मोबाईल बेल्ट तयार केला.
सुरक्षिततेसह सौंदर्याचा मिलाफ
हा बेल्ट मोत्यांपासून आणि वेगवेगळ्या वेगन मटेरियलपासून बनवला जातो. त्यामध्ये सौंदर्यासोबतच सुरक्षिततेलाही विशेष महत्त्व दिलं आहे. मोबाईल जवळ ठेवताना चोरी किंवा गहाळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन आकांक्षाने हा बेल्ट मजबूत आणि सुरक्षित बनवला आहे.
अहमदाबादमध्ये लाइफस्टाइल ॲक्सेसरीज डिझाइन या विषयाचं शिक्षण घेतलेल्या आकांक्षाने या क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलं आहे. ती पूर्वी डिझायनर म्हणून काम करत होती; मात्र “आपल्यात असलेली कला वापरून स्वतःचा काहीतरी वेगळा व्यवसाय उभा करायचा” असा निर्णय घेत तिने ‘Adorn’ ची सुरुवात केली.
डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाढतंय यश
आज तिच्या या ब्रँडला सोशल मीडिया, ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्स आणि विविध एक्झिबिशन्समधून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सध्या तिच्या वार्षिक कमाईचा आकडा सुमारे पाच ते सात लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे.