पुणे : अक्षय तृतीया हा हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी खरेदी केलेली संपत्ती 'अक्षय' राहते, असं मानलं जातं. परंपरेनुसार लोक या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करतात. गतवर्षी सोन्यापेक्षा चांदीने जास्त रिटर्न्स दिले आहेत. त्यामुळे यंदा अक्षय तृतीयेला चांदी की सोनं खरेदी करावं? असा प्रश्न अनेकांना असेल. याचबाबत पुण्यातील सराफा व्यावसायिक राजू चव्हाण यांनी माहिती दिलीये.
advertisement
गतवर्षी चांदीचे रिटर्न्स जास्त
गेल्या वर्षीची आकडेवारी पाहिली तर सोन्यापेक्षा चांदीनेच जास्त परतावा दिला आहे. त्यामुळे यंदा अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करावं की चांदी? असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे. गतवर्षी 80 हजार रुपये प्रतिकिलोच्या दरम्यान असणारे चांदीचे दर यंदा 1 लाख 5 हजार रुपयांपर्यंत गेले आहेत.
दिवाळीनंतर सोन्याची उसळी
गतवर्षी अक्षय तृतीयेला 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर हे 73 हजार रुपयांच्या जवळपास होते. दिवाळीनंतर मात्र सोन्याच्या दरांनी मोठी उसळी घेतली. यंदा एप्रिलमध्ये सोन्याने एक लाखाचा टप्पा पार केला. त्यामुळे जवळपास 31 टक्के परतावा सोन्यातील गुंतवणुकीवर मिळाला. त्यामुळे काहीजण सोन्याच्या गुंतवणुकीला पसंती देत आहेत.
तज्ज्ञ काय सांगतात?
सोन्यातील गुंतवणूक नेहमीच फायद्याची राहिली आहे. त्यामुळे भारतीय सण, समारंभ आणि उत्सवात आवर्जून सोन्याची खरेद करतात. अक्षय तृतीयेला सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. तरीही भविष्यात सोनं आणखी महागणार आहे. त्यामुळे चांगल्या परताव्यासाठी आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोनं खरेदीच लाभदायी असल्याचं राजू चव्हाण सांगतात.