जालना: हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण अक्षय तृतीया आता अवघ्या काही तासावर आहे. अक्षय तृतीया आणि सोनं खरेदी याचं अतूट असं नातं आहे. बहुतांश सर्वसामान्य नागरिक या दिवशी सोनं खरेदीला प्राधान्य देतात. यामुळे सराफा बाजारात देखील गजबज पाहायला मिळत आहे. एक लाखांचा टप्पा गाठल्यानंतर सोन्याच्या दरात काहीशी घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात झालेली ही घसरण का झाली? अक्षय तृतीयाला परिस्थिती कशी असू शकते? याबाबत जालना शहरातील सराफा असोसिएशनचे सचिव गिरीधर लाल लधानी यांनी माहिती दिली आहे
advertisement
जागतिक घडामोडींचा परिणाम
जागतिक घटना आणि घडामोडींमुळे सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असतात. गेल्या काही दिवसांत 24 कॅरेट सोन्याचे दर हे एक लाख एक हजार रुपये प्रती 10 ग्रॅमपर्यंत पोहोचले होते. जागतिक अस्थिरतेमुळे सोन्याच्या दरांत अचानक तेजी आल्याचे दिसते. सध्या रशिया आणि युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर हमास आणि इस्राइल मधील युद्ध देखील कमी होत आहे. याचाच परिणाम म्हणून चार ते पाच हजारांची घट सोन्याच्या दरात झाली आहे.
बाजार गोंधळलेल्या स्थितीत
भारत आणि पाकिस्तान दरम्यान सध्या तणावाची स्थिती आहे. त्यामुळे बाजार सध्या गोंधळलेल्या अवस्थेत आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वसामान्य नागरिक आवर्जून सोने खरेदी करतात. या दिवशी सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी असणारच आहे. सोन्याचे दर मात्र आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर ठरत असल्याने त्याचा स्थानिक बाजारपेठामुळे फारसा परिणाम होत नाही, असं लधानी सांगतात.
तर सोन्याचे दर 85 हजारांवर येतील
सध्या सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 96 हजार ते 97 हजार यादरम्यान आहेत. जर संपूर्ण विश्वामध्ये शांतता प्रस्थापित झाली तर सोन्याचे तर हे 85 हजार पर्यंत खाली येऊ शकतात. परंतु तशी शक्यता फार कमी असल्याने सोन्याचे दर हे 90 हजार ते एक लाख रुपये प्रति तोळा या दरम्यान राहतील, असं गिरीधर लाल लधानी यांनी सांगितलं.