जालना: अक्षय तृतीया हा सण हिंदू धर्मामध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या सणाला धार्मिक इतर बाबतीत देखील महत्त्व आहे. अनेकजण अक्षय तृतीयेपासूनच आंबा खाण्याला सुरुवात करतात. त्यामुळे आंबे बाजारामध्ये अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच आंब्याच्या दरामध्ये देखील या दिवशी मोठे उलटफेर दिसतात. यंदा 30 एप्रिलला अक्षय तृतीया संपूर्ण भारतभरात साजरी होत आहे. याच पार्श्वभूमीवर जालन्यातील आंबा मार्कटमध्ये आंब्याचे दर आणि आवक याबाबत जाणून घेऊ.
advertisement
अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील फळबाजारामध्ये आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. केसर, बदाम, लालबाग, शाही गुलाब, दशहरी, लंगडा अशा पद्धतीच्या आंब्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी बाजारात उपलब्ध आहेत. आंब्याच्या दरामध्ये 30 रुपयांपासून ते 50 रुपयांपर्यंत प्रति किलोमागे वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. फळबाजारामध्ये आंब्यांना 80 रुपयांपासून 150 रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे तर किरकोळ बाजारामध्ये हाच दर 150 रुपयांपासून 220 रुपये प्रति किलो पर्यंत वाढला आहे.
आंबा महागला
अक्षय तृतीया असल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बाजारामध्ये भरपूर प्रमाणात ग्राहक आल्याने विक्री देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. आंब्याची आवक जवळपास 3 हजार क्विंटल पर्यंत होत आहे. अनेक लोक अक्षय तृतीयेपासून आंबे खरेदी करण्यास सुरुवात करतात. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आंबे बाजारामध्ये तेजी पाहायला मिळत असून किलोमागे 30 ते 50 रुपयांची वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, 8 दिवसांपूर्वी केसर आंबा हा 100 ते 120 रुपये प्रति किलो या दराने विक्री होत होता. तोच मंगळवारी 140 ते 150 रुपये प्रति किलो या दराने विक्री होत आहे. तसेच बदाम हा 80 रुपये प्रति किलो या दराने विक्री होत आहे. लालबाग 60 रुपये प्रति किलो या दराने विक्री होत आहे. अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आंब्याचे दर बदलले असले तरी आगामी काळात आवक वाढून आंब्यांचे दर हे 100 रुपयांच्या आसपास राहतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितलं.