न्यूयॉर्क: ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अमेझॉनमध्ये येत्या काही वर्षांत तब्बल 5 लाखांहून अधिक नोकऱ्या रोबोट्स घेऊ शकतात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. याचा अर्थ असा की, कंपनीच्या वेअरहाऊसमध्ये पिकिंग, पॅकिंग आणि डिलिव्हरीसारखी अनेक महत्त्वाची कामे आता रोबोट्स करतील आणि त्यामुळे माणसांची गरज मोठ्या प्रमाणात कमी होईल. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या एका ताज्या अहवालात ही माहिती उघड झाली आहे.
advertisement
अमेरिकेत तीनपट वाढलेली वर्कफोर्स, पण आता...
2018 पासून अमेझॉनची अमेरिकेतील वर्कफोर्स तीनपट वाढून सुमारे 12 लाखांपर्यंत पोहोचली आहे. परंतु, आता कंपनी ऑटोमेशनवर भर देत असल्याने नव्या भरतीला ब्रेक लागू शकतो. अमेझॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोर्डसमोर सादर केलेल्या प्रस्तावानुसार, 2033 पर्यंत विक्री दुप्पट करण्याचा अंदाज असला तरी रोबोटिक ऑटोमेशनमुळे कंपनीला नव्या कर्मचाऱ्यांची गरज भासणार नाही. याचा थेट अर्थ असा की, अमेझॉनला 5 लाखांहून अधिक अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती करण्याची आवश्यकता उरणार नाही.
2027 पर्यंत तब्बल 1 लाख कोटी रुपयांची बचत
अमेझॉनच्या आंतरिक दस्तावेजांनुसार, हे रोबोट्स प्रत्येक आयटमचे सिलेक्शन, पॅकिंग आणि डिलिव्हरी करताना 30 सेंट (सुमारे 2.5) इतकी बचत करतील. या बचतीचा एकत्रित परिणाम म्हणून, 2025 ते 2027 दरम्यान कंपनीला सुमारे 12.6 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 1 लाख कोटी रुपयांची बचत होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ऑपरेशन्सपैकी 75% भाग पूर्णपणे ऑटोमेट करण्याचे लक्ष्य
अमेझॉनने असा आराखडा तयार केला आहे की, भविष्यातील वेअरहाऊसमध्ये माणसांची संख्या खूपच कमी असेल. हे वेअरहाऊस सुपरफास्ट डिलिव्हरीसाठी खास डिझाइन केले जात आहेत. कंपनीच्या रोबोटिक्स टीमने 75% ऑपरेशन्स ऑटोमेट करण्याचे अंतिम लक्ष्य ठेवले आहे.
फक्त 25% कमी वर्कफोर्स
अमेझॉनने गेल्या वर्षी श्रेवपोर्ट (Shreveport) येथे आपले सर्वात अत्याधुनिक वेअरहाऊस सुरू केले. येथे 1,000 हून अधिक रोबोट्स काम करतात, आणि या फॅसिलिटीमुळे पूर्वीच्या नॉन-ऑटोमेटेड सेटअपच्या तुलनेत वर्कफोर्स 25% ने कमी झाला आहे.
कंपनीचा बेत असा आहे की 2027 च्या अखेरीपर्यंत श्रेवपोर्ट मॉडेलप्रमाणे सुमारे 40 नवी वेअरहाऊसेस उभी केली जातील. यातील पहिली पायरी वर्जिनियामध्ये सुरू झालेल्या नव्या वेअरहाऊसपासून झाली आहे. अमेझॉनने आपली जुनी वेअरहाऊसेस देखील या मॉडेलनुसार रिनोवेट करणे सुरू केले आहे.
अमेझॉनचा दावा
या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना, अमेझॉनच्या प्रवक्त्या केली नॅन्टेल यांनी म्हटले की, न्यूयॉर्क टाइम्सला मिळालेले दस्तावेज पूर्ण नाहीत. हे आमच्या कंपनीच्या संपूर्ण हायरिंग स्ट्रॅटेजीचे प्रतिनिधित्व करत नाहीत, तर फक्त एका ग्रुपच्या मतांचे प्रतिबिंब आहेत. त्यांनी हेही सांगितले की, हॉलिडे सीझनसाठी कंपनी 2.5 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. मात्र त्यापैकी कायमस्वरूपी किती असतील, हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही.
आम्ही नव्या नोकऱ्या निर्माण करतो
अमेझॉनचे ग्लोबल ऑपरेशन्स हेड उदित मदन यांनी एका मुलाखतीत म्हटले, ऑटोमेशनमुळे एखाद्या भागात कार्यक्षमता वाढते, पण ती संपूर्ण गोष्ट तशी नसते. आमचा जुना परंपरागत नियम असा आहे की, ऑटोमेशनमुळे जे पैसे वाचतात, त्यांचा वापर आम्ही नव्या नोकऱ्या तयार करण्यासाठी करतो. उदाहरणार्थ: अलीकडेच आम्ही ग्रामीण भागात जास्त डिलिव्हरी डिपो उघडले. म्हणजेच अमेझॉनचा दावा आहे की रोबोट्समुळे वाचलेले पैसे नव्या क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मितीसाठी वापरले जातील.
