मुंबई: हिंदू नववर्ष संवत्सर 2082 च्या पहिल्या दिवशी झालेल्या पारंपरिक मुहूर्त ट्रेडिंग सत्राची (Muhurat Trading) आज (मंगळवार) दुपारी 2:45 वाजता सकारात्मक शेवट झाला. या शुभ तासाभराच्या विशेष सत्रात शेअर बाजाराने सौम्य वाढीसह दिवाळीचे स्वागत केले.
मुंबई शेअर बाजाराचा (BSE Sensex) निर्देशांक सुरुवातीला तब्बल 300 अंकांनी वाढून उघडला आणि अखेरीस 62.97 अंकांनी म्हणजेच 0.07 टक्क्यांनी वाढून 84,426.34 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE Nifty) निर्देशांकही 25.45 अंकांनी म्हणजेच 0.01 टक्क्यांनी वाढून 25,868.60 वर स्थिरावला.
advertisement
सुरुवातीच्या व्यवहारात सेंसेक्स जवळपास 300 अंकांनी वाढला होता, तर निफ्टीने 25,900 ची पातळी ओलांडली होती. मात्र 1:55 वाजेपर्यंत सेंसेक्स 190 अंकांच्या वाढीसह 84,552.82 वर आणि निफ्टी 63 अंकांनी वाढून 25,906.25 वर व्यवहार करत होता.
मुहूर्त ट्रेडिंगचा प्री-ओपन सत्र दुपारी 1:30 वाजता सुरू झाले होते आणि त्यावेळीही बाजारात सकारात्मक भावना दिसून आली.
हिंदू नववर्षाची शुभ सुरुवात
दिवाळीच्या दिवशी सुरू होणारा हा मुहूर्त ट्रेडिंग सत्र विक्रम संवत 2082 या हिंदू नववर्षाची सुरुवात दर्शवतो. या शुभ वेळी केलेले व्यवहार समृद्धी आणि आर्थिक प्रगतीचे प्रतीक मानले जातात.
अधिकृत नियोजनानुसार, या मुहूर्त सत्रात झालेले सर्व व्यवहार हे सामान्य ट्रेडिंगप्रमाणेच सेटलमेंट बंधनांखाली येतील, म्हणजेच खरेदीदार व विक्रेत्यांच्या पेमेंट आणि डिलिव्हरीची पूर्तता नियमित पद्धतीने होईल.
परंपरेचा वारसा
मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा 1957 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजने (BSE) सुरू केली होती, आणि नंतर 1992 मध्ये नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (NSE) ती स्वीकारली. पारंपरिकरित्या, दलाल या दिवशी “चोपडा पूजन” करतात म्हणजे हिशोबाच्या वह्यांचे पूजन करून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात समृद्धी आणि शुभ लाभाच्या प्रार्थनेसह केली जाते.