सोन्याच्या दागिन्यांमुळे पत्नीला चक्क आयकर विभागाची नोटीस आल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. हे प्रकरण बंगळुरूमधील असलं तरी प्रत्येक महिलेसाठी महत्त्वाचं आहे. या महिलेकडून आयकर विभागाने 1.65 कोटी रुपयांचे दागिने जप्त केले आणि त्यावरुन वाद सुरू झाला. ११ सप्टेंबर २०२५ रोजी इन्कम टॅक्स अपीलेट ट्रिब्युनलने दिलेल्या निर्णयामुळे करदात्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement
बिलांशिवाय दागिने खरेदी केल्याचा आरोप
हा संपूर्ण प्रकार १४ नोव्हेंबर २०१९ रोजी सुरू झाला. त्यावेळी आयकर विभागाने सुरेश (नाव बदललं आहे) यांच्या घरावर छापा टाकला आणि त्यांच्या घरातून १.६५ कोटी रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले. यानंतर विभागाने सुरेश यांना नोटीस पाठवली. हे दागिने कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय खरेदी केले गेले आहेत त्याची कोणतीही बिलं नाहीत असं या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं होतं. ही रक्कम सुरेश यांच्या उत्पन्नात जोडण्यात आली आणि त्यावर कर आकारण्यात आला. यासंबंधात त्यांना नोटीस पाठवण्यात आली.
सुरेश यांनी आयकर विभागाला उत्तर देताना सांगितले की, हे दागिने त्यांच्या पत्नीचे आहेत आणि ते बँक किंवा क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करण्यात आले होते. त्यांनी काही खरेदीची बिलेही सादर केली. मात्र, आयकर अधिकाऱ्यांनी ही बिले स्वीकारण्यास नकार दिला. अधिकाऱ्यांच्या मते, बिले आणि जप्त केलेले दागिने यांचा तपशील जुळत नव्हता, तसेच काही दागिन्यांची खरेदी छाप्याच्या तारखेनंतर करण्यात आल्याचे आढळले होते. सुरेश यांनी काही दागिने भेट म्हणून किंवा वारसा हक्काने मिळाल्याचेही सांगितले, पण त्यासाठी त्यांच्याकडे ठोस कागदपत्रे नव्हती.
सुरेश यांनी त्यांच्या आयकर रिटर्नमध्ये स्वतःच्या नावावर फक्त ५ लाख रुपयांचे आणि पत्नीच्या नावावर ९८ लाख रुपयांचे दागिने दाखवले होते. उर्वरित १.६५ कोटी रुपयांच्या दागिन्यांचा कोणताही हिशेब त्यांनी दिला नव्हता. त्यामुळे विभागाने ही रक्कम त्यांच्या उत्पन्नात जोडली. त्यामुळे आयकर विभागाने त्यांना नोटीस पाठवल्याचं स्पष्ट केलं.
कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
आयकर विभागाच्या निर्णयावर सुरेश यांनी कमिश्नर ऑफ अपील्स (CIT-A) मध्ये अपील दाखल केले आणि तिथे त्यांना दिलासा मिळाला. या निर्णयाला आव्हान देत आयकर विभागाने बंगळूरुच्या ITAT मध्ये धाव घेतली. ११ सप्टेंबर २०२५ रोजी ITAT ने सुरेश यांच्या बाजूने निकाल दिला आणि आयकर विभागाचे अपील फेटाळले. ट्रिब्युनलने आपल्या निकालात म्हटले की, सुरेश आणि त्यांच्या पत्नीसाठी विभागाने एकाच प्रकारची नोटीस काढली होती. पत्नीच्या आयकर रिटर्नमध्ये दागिन्यांचा हिशेब आधीच स्वीकारण्यात आला होता. त्यामुळे, जे दागिने पत्नीची मालमत्ता म्हणून आधीच विचारात घेतले गेले आहेत, तेच दागिने सुरेश यांच्या नावावर पुन्हा कर आकारण्यासाठी जोडणे योग्य नाही.
दागिने खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
या प्रकरणानंतर चार्टर्ड अकाउंटंट सुरेश सुराना यांनी करदात्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, अशा प्रकारच्या कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी लोकांनी प्रत्येक दागिन्याच्या खरेदीचे योग्य बिल आणि कागदपत्रे जपून ठेवावीत. दागिने भेट म्हणून किंवा वारसा हक्काने मिळाले असल्यास, त्याचे प्रमाणित दस्तऐवज असणे आवश्यक आहे. यामुळे आयकर विभागाच्या तपासणीमध्ये कोणत्याही अडचणी येत नाहीत.
प्रत्येक दागिन्यासोबत GST बिल किंवा पक्के बिल घेणं आवश्यक आहे. कच्चे बिल तुम्हाला अडचणीत आणू शकतं. जर तुम्हाला लग्नात किंवा गिफ्ट म्हणून मिळालेले दागिने असतील तर त्याचा हिशोब देखील व्यवस्थित ठेवणं आवश्यक आहे. अन्यथा नोटीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चुका टाळण्यासाठी आधीच काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे.
