कामावर जायला उशीर झाला अन् आयुष्य बदललं! शेतमजूर महिला झाली उद्योजक, आता लाखात उलाढाल!
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Business Success: वडिलांच्या सल्ल्यानुसार रुक्मिणी यांनी गेल्या 10-15 वर्षांपूर्वी घरीच लांबोटी चिवडा बनवण्यास सुरुवात केली. आता लाखात उलाढाल होतेय.
सोलापूर - गरज ही शोधाची जननी असते, असे म्हटले जाते. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावच्या रुक्मिणी चौधरी यांनी हे वाक्य प्रत्यक्ष कृतीत उतरवून दाखवले आहे. एकेकाळी दुसऱ्याच्या शेतात मजूर म्हणून जाणाऱ्या रुक्मिणीताई आज स्वतःचा गृहउद्योग चालवत असून, चिवडा विक्रीच्या व्यवसायातून महिन्याला 1 ते 1.50 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.
रुक्मिणी चौधरी यांचा हा प्रवास सोपा नव्हता. त्या आधी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेतमजुरी करत असत. एकदा शेतात कामाला जाण्यास थोडा उशीर झाला, म्हणून मालकाने त्यांना कामावरून परत पाठवले. या घटनेने त्या मनातून खचल्या, मात्र घरी परतल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना एक मोलाचा सल्ला दिला. "दुसऱ्याच्या शेतात कामकरण्यापेक्षा घरातच काहीतरी व्यवसाय सुरू कर,” हा वडिलांचा सल्ला ऐकला आणि त्यांचं आयुष्य बदललं.
advertisement
आता थांबायचं नाय! मुलगा इंजिनिअर, घरात लेकीच्या लग्न! पण 52 वर्षीय आई आधी देणार दहावीचा पेपर!, Video
घरीच चिवडा बनवण्यास सुरुवात
वडिलांच्या सल्ल्यानुसार रुक्मिणी यांनी गेल्या 10-15 वर्षांपूर्वी घरीच चिवडा बनवण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे मिळणारा माल पूर्णपणे घरगुती पद्धतीचा आणि चवदार असतो. त्यांच्या उत्पादनांमध्ये प्रामुख्याने समावेश आहे, मक्याचा चिवडा, पोह्यांचा चिवडा, शेव चिवडा, शेंगा चटणी, डिंक लाडू, शेंगा लाडू हे सर्व पदार्थ त्या स्वतः तयार करतात. त्यांच्या चिवड्याचे दर अगदी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे असून 15 रुपयांच्या पाकिटापासून ते 300 रुपये किलोपर्यंत चिवडा त्यांच्याकडे उपलब्ध आहे.
advertisement
केवळ उत्पादन करून त्या थांबल्या नाहीत, तर मार्केटिंगसाठी त्यांनी स्वतः कंबर कसली आहे. त्या स्वतः लांबोटी गावासह मोहोळ-पंढरपूर महामार्ग आणि सोलापूर-पुणे महामार्गावर थांबून चिवडा विक्री करतात. त्यांच्या चिवड्याची चव इतकी प्रसिद्ध झाली आहे की, आजूबाजूच्या कुरुल, कामती, बीबी दारफळ आणि पाकणी यांसारख्या गावांतील नागरिक आवर्जून लांबोटीला चिवडा खरेदीसाठी येतात.
दरम्यान, महिलांनी घराबाहेर पडून काहीतरी स्वतःचे काम करावे. जिद्द आणि चिकाटी असेल तर यश नक्कीच मिळतो, असा सल्ला महिला उद्योजक रुक्मिणी चौधरी देतात.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Mar 08, 2026 10:22 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
कामावर जायला उशीर झाला अन् आयुष्य बदललं! शेतमजूर महिला झाली उद्योजक, आता लाखात उलाढाल!







