समुद्रात उडी अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड! वय वर्षे सहा, पण पाटलाच्या लेकाची कामगिरी तर पाहा
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
World Record: अवघ्या सहा वर्षीय मानसच्या या धाडसी कामगिरीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे.
समुद्रातील प्रचंड लाटा, बदलणारे प्रवाह आणि जहाजांची सततची वर्दळ… अशा धोकादायक परिस्थितीत 17 किमी सागरी अंतर पोहून पार करणे हे अनेक अनुभवी पोहणाऱ्यांसाठीही मोठे आव्हान मानले जाते. मात्र, उरण तालुक्यातील केगाव येथील अवघ्या सहा वर्षीय चिमुकला मानस जयेश पाटील याने हे आव्हान स्वीकारत पीरवाडी बीच ते जेएनपीए बंदर हे अंतर अवघ्या 4 तास 49 मिनिटे 50 सेकंदांत पोहून पूर्ण केले.
advertisement
मानसला लहानपणापासूनच पोहण्याची विशेष आवड होती. त्याची ही आवड ओळखून त्याचे आई-वडील यांनी पीरवाडी बीच ते जेएनपीए बंदर या सागरी मार्गावर पोहण्याची इच्छा प्रशिक्षक संतोष पाटील यांच्याकडे व्यक्त केली. त्यानंतर संतोष पाटील यांनी मानसला समुद्रातील पोहण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. लहान वय असूनही मानसने प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने सराव करत मोठ्या आव्हानासाठी स्वतःला तयार केले.
advertisement
साधारणपणे अशा प्रकारच्या सागरी पोहण्याच्या प्रशिक्षणासाठी वर्षभराचा कालावधी लागतो. मात्र, मानसच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे आणि मेहनतीमुळे प्रशिक्षणादरम्यानच त्याला समुद्रातील कठीण परिस्थितींचा सामना करण्याचे धडे देण्यात आले. मोठ्या लाटांशी कसा मुकाबला करायचा, प्रतिकूल हवामानात कसे पोहायचे तसेच समुद्रातील उलटसुलट प्रवाहांमध्ये संतुलन कसे राखायचे याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण त्याला देण्यात आले.
advertisement
शुक्रवारी (दि.6) सकाळी मानसने पीरवाडी बीच येथून समुद्रात झेप घेतली. पीरवाडी बीच (नागाव, केगाव) ते जेएनपीए बंदर हा सागरी मार्ग सतत बदलणारे प्रवाह, मोठ्या लाटा आणि मालवाहू जहाजांच्या वर्दळीमुळे अत्यंत धोकादायक मानला जातो. अशा कठीण परिस्थितीतही मानसने धैर्याने समुद्रात पोहत पुढे जात प्रचंड लाटा आणि समुद्रातील उलटसुलट प्रवाहांचा यशस्वी सामना केला.
advertisement
मानसने अखेरीस 17 किमी सागरी अंतर 4 तास 49 मिनिटे 50 सेकंदांत पूर्ण करत जेएनपीए बंदर गाठले. या धाडसी कामगिरीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. एवढ्या लहान वयात केलेल्या या अद्वितीय पराक्रमामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून मानस पाटीलचे कौतुक केले जात आहे.










