चहूबाजूंनी घेरलं दणकून मारलं तरी इराण नाही नमलं! अमेरिकेनं इराणला दिली शेवटची वॉर्निंग
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Iran war update: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणच्या बिनशर्त शरणागतीची मागणी केली आहे. अमेरिकेने इराणमधील ३००० पेक्षा जास्त लष्करी तळांवर हल्ले केले आहेत.
इराणसोबत आता कोणतीही चर्चा नाही आणि कोणताही समझोता नाही. आम्हाला फक्त एकच गोष्ट मान्य आहे, ती म्हणजे इराणचं बिनशर्त शरणागती!" अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या एका विधानाने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल'वर स्पष्ट लिहिलंय की, आता वेळ निघून गेली आहे, इराणने 'अनकंडिशनल सरेंडर' करावं, तरच युद्ध थांबेल. इराणला रशियाकडून मिळणारी गुप्त माहिती आणि प्रत्यक्ष युद्धभूमीवर इराणने दिलेला लढा पाहता, ट्रम्प यांनी आता थेट सत्तापालटाचे संकेत दिले असून Make Iran Great Again असा नारा दिला.
३००० हून अधिक तळांवर अमेरिकेकडून हल्ला
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धात अमेरिकेने इराणला चहूबाजूंनी कोंडीत पकडलं. अमेरिकन लष्कराने केलेल्या दाव्यानुसार, ऑपरेशन एपिक फ्युरी अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ३००० पेक्षा जास्त लष्करी तळांवर भीषण बॉम्बवर्षाव करण्यात आला आहे. यामध्ये इराणचे बॅलिस्टिक मिसाइल साठवणूक केंद्र आणि आयआरजीसीचे मुख्य कमांड सेंटर्स उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. इराणची ४३ युद्धनौकाही या हल्ल्यात जमीनदोस्त झाल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. पण इतका मार खाऊनही इराण नमलेला नाही, हेच सध्याच्या परिस्थितीचं सर्वात मोठं वास्तव आहे.
advertisement
हॉस्पिटल आणि शाळांनाही टार्गेट
युद्धाच्या या रणधुमाळीत नागरी वस्त्या भरडल्या जात आहेत. तेहरानमधील गांधी हॉस्पिटलपासून अवघ्या १०० फुटांवर ४० फुटी खड्डा पडेल इतका मोठा स्फोट झाला, ज्यामुळे हॉस्पिटलमधील काचा फुटल्या आणि गंभीर रुग्णांना जीव मुठीत धरून बाहेर पळावं लागलं. दक्षिण इराणमध्ये तर एका शाळेवर झालेल्या हल्ल्यात १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आतापर्यंत १३ आरोग्य केंद्रांवर हल्ले झाल्याची पुष्टी केली असून युद्धाची ही किंमत सामान्य लोक मोजत आहेत.
advertisement
तेल अवीववर मिसाइलचा पाऊस
इराण शांत बसेल असं वाटत असतानाच, त्यांनीही आपला इंगा दाखवला आहे. शनिवारी पहाटे इराणने थेट इस्रायलच्या तेल अवीव शहरावर मिसाइल आणि रॉकेटचा पाऊस पाडला. तेहरानच्या मेहराबाद एअरपोर्टजवळ भीषण आगीचे लोट पाहायला मिळाले आहेत. तर दुसरीकडे, सौदी अरेबियानेही आपल्या हवाई हद्दीत घुसलेले इराणचे चार ड्रोन्स पाडले आहेत. म्हणजेच हे युद्ध आता केवळ दोन देशांत राहिलं नसून संपूर्ण आखातात पसरलं आहे.
advertisement
सत्तापालटाची तयारी सुरू
इराणने शरणागती पत्करली की तिथे नवं नेतृत्व आणलं जाईल असे थेट ट्रम्प यांनी संकेत दिले आहेत. "इराणची सत्ता आता कमकुवत झाली आहे. तिथे लोकशाही असो वा नसो, आम्हाला फरक पडत नाही, फक्त तो नेता अमेरिका आणि इस्रायलचा शत्रू नसावा," असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. रशियाकडून इराणला अमेरिकन जहाजांची माहिती मिळत असल्याच्या वृत्तावर विचारलं असता, ट्रम्प यांनी याला 'बेकार सवाल' म्हणत उत्तर देणं टाळलं, पण त्यांचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी "आम्हाला सगळं माहित आहे," असं म्हणत रशियालाही इशारा दिला आहे.
advertisement
इराणला गुडघ्यावर टेकवण्यासाठी अमेरिकेने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे, पण इराणनेही 'मरेल पण झुकणार नाही' असा पवित्रा घेतल्याने हे युद्ध आता विनाशाच्या कोणत्या वळणावर थांबणार, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. हे युद्ध आणखी ५ आठवड्यांपर्यंत चालेल असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. इराण कोणतीही नरमाईची भूमिका घेण्यासाठी तयार नाही हे सध्या स्पष्ट दिसत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 07, 2026 8:54 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
चहूबाजूंनी घेरलं दणकून मारलं तरी इराण नाही नमलं! अमेरिकेनं इराणला दिली शेवटची वॉर्निंग







