Weather Alert: महाराष्ट्रावर आग ओकणारं संकट, कोकण ते विदर्भ 72 तासांसाठी अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात मे महिन्यासारखी उष्णता मार्चमध्येच जाणवत असल्याचे चित्र आहे. 7 मार्च रोजीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
मुंबई: महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्य आग ओकत असल्याचे चित्र आहे. गेल्या आठवडाभरात राज्यात तापमानात 3-4 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानवाढ झाली आहे. काही ठिकाणी पारा चाळीशी पार गेला असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. आज 7 मार्च रोजीच्या राज्यातील हवामान आणि तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.
मुंबईसह उत्तर कोकणातील जिल्ह्यांना गेल्या काही दिवसांत उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट कायम आहे. आज देखील मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत हवामानाची हीच स्थिती कायम राहणार असून पुढील 72 तासांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. उष्णतेचा पारा आज 36 अंश सेल्सिअसपर्यंत राहणार असून किनारी भागात उष्ण आणि दमट स्थिती राहणार आहे.
advertisement
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापुरात तापमानात मोठी वाढ झाली आहे. किमान तापमान 18-22 अंशांदरम्यान असून सकाळी काहीसा गारवा जाणवत आहे. मात्र दुपारी उन्हाचे चटके वाढले असून पारा 35-38 अंशांपर्यंत गेला आहे. आज देखील सरासरीपेक्षा तापमान जास्तच राहील.
advertisement
मराठवाड्यात तीव्र उष्णता जाणवत आहेत. मे महिन्यातील चटके मार्चमध्येच बसत असल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगरसह, जलाना, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत तापमान वाढ झाली असून कमाल तापमान 36-39 अंशांवर गेलं आहे. किमान तापमान 18-22 अंश सेल्सिअस राहील.
विदर्भातील नागपूरसह इतर जिल्ह्यांत तापमान चाळीशीपार गेलं आहे. हवामान कोरंड आणि उष्ण राहील. अमरावतीसारख्या भागात उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. आज कमाल तापमान 38-41 अंश तर किमान तापमान 20-23 अंशांदरम्यान राहील. या भागात उष्णतेच्या लाटेची सुरुवात होण्याची शक्यता आहे.
advertisement
शनिवारी राज्यातील बहुतांश भागात उष्ण आणि कोरडे हवामान राहील. तर कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट हवामानाचा अलर्ट आहे. महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि पावसाची कोणतीही शक्यता नाही. तापमान सरासरीपेक्षा 2-5 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलं असून उन्हाळा अजून तीव्र होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत बाहेर फिरणे टाळावे. भरपूर पाणी प्या आणि थेट सूर्यप्रकाळ टाळावा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 07, 2026 7:07 AM IST









