मुंबई: सोमवार १० नोव्हेंबरला शेअर बाजार बंद झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी एक्सचेंजला (Exchange) महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे मंगळवारी बाजार उघडल्यावर ब्रिटानिया (Britannia), डॉम्स इंडस्ट्रीज (Doms Industries), हुडको (HUDCO), व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea), एचईजी (HEG), डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज (Dr. Reddy’s Laboratories), बजाज फायनान्स (Bajaj Finance), जिंदाल स्टेनलेस (Jindal Stainless), सुब्रोस लिमिटेड (Subros Ltd) आणि बजाज कन्झ्युमर (Bajaj Consumer) या शेअर्समध्ये मोठी ॲक्शन दिसण्याची शक्यता आहे.
advertisement
ब्रिटानिया इंडस्ट्रीज (Britannia Industries) च्या संदर्भात मोठी बातमी आहे की, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ वरुण बेरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जो १० नोव्हेंबर २०२५ पासून लागू होईल. वरुण बेरी गेल्या १३ वर्षांपासून कंपनीचे नेतृत्व करत होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीने सध्याचे सीएफओ नटराजन वेंकटरमन यांची अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी (Interim CEO) म्हणून नियुक्ती केली आहे.
डॉम्स इंडस्ट्रीज (Doms Industries) चा सप्टेंबर तिमाहीतील निव्वळ नफा १३.५२ टक्क्यांनी वाढून ५८.२६ कोटी झाला आहे, तर मागील वर्षी याच तिमाहीत तो ५१.३२ कोटी होता. याच काळात कंपनीचा महसूल (Revenue) २४ टक्क्यांनी वाढून ५६७.९ कोटीवर पोहोचला आहे.
हुडकोचा (HUDCO) नफा ३ टक्क्यांनी वाढून ७०९.८ कोटी झाला आहे, तर त्यांची निव्वळ व्याज कमाई (Net Interest Income) ३१.८ टक्क्यांनी वाढत १,०५० कोटी झाली आहे. हुडकोने १/शेअर अंतरिम लाभांश (Interim Dividend) देखील जाहीर केला आहे.
वोडाफोन आयडियाच्या (Vodafone Idea) सप्टेंबर तिमाहीच्या कामगिरीत सुधारणा दिसून आली आहे. कंपनीचा तोटा मागील तिमाहीतील ६,६०८ कोटींवरून १६.४ टक्क्यांनी कमी होऊन ५,५२४ कोटींवर आला आहे. कंपनीचा महसूल (Revenue) १.६ टक्क्यांनी वाढून ११,१९४ कोटी झाला आहे.
एचईजीचा (HEG) नफा ७२.७ टक्क्यांनी वाढून ₹१४३ कोटी झाला, तर त्यांची एकूण आय (Revenue) २३.२ टक्क्यांनी वाढून ६९९.२ कोटी झाली आहे.
याशिवाय, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज (Dr. Reddy’s Laboratories) मध्ये कंपनीच्या बायोलॉजिक्स विभागाचे ग्लोबल हेड जयंत श्रीधर यांनी आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ३१ जानेवारी २०२६ पासून प्रभावी ठरणारा राजीनामा दिला आहे.
बजाज फायनान्सने (Bajaj Finance) सप्टेंबर २०२५ तिमाहीत मजबूत आर्थिक कामगिरी नोंदवली आहे. कंपनीचा एकत्रित नफा (Consolidated Profit) वार्षिक आधारावर २२ टक्क्यांनी वाढून ४,००० कोटींवरून ४,८७५ कोटींवर पोहोचला आहे. कंपनीच्या एकूण महसुलातही (Total Revenue) १८ टक्क्यांची वाढ होऊन तो १७,०९१ कोटींवरून २०,१७९ कोटी झाला आहे.
जिंदाल स्टेनलेसचा (Jindal Stainless) नफा ३२ टक्क्यांनी वाढून ८०६.९ कोटी झाला असून त्यांची एकूण आय ११.४ टक्क्यांनी वाढत १०,८९२ कोटीवर पोहोचली आहे.
ऑटोमोबाइल एअर-कंडिशनिंग सिस्टीम बनवणाऱ्या सुब्रोस लिमिटेडचा (Subros Ltd) नफा ११.८ टक्क्यांनी वाढून ४०.७ कोटी झाला असून महसूल ६.२ टक्क्यांनी वाढून ८७९.८ कोटी झाला आहे. तसेच बजाज कन्झ्युमरचा (Bajaj Consumer) निव्वळ नफा ३२.७ टक्क्यांनी वाढून ४२.२ कोटी झाला आहे.
