मुंबई: महाराष्ट्र भारतातील पहिले राज्य ठरले आहे ज्याने औपचारिकरित्या एलन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीसोबत सॅटेलाइट-आधारित इंटरनेट सेवांसाठी भागीदारी केली आहे. या ऐतिहासिक सहयोगाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांनी स्टारलिंकला माहिती आणि संवाद तंत्रज्ञान (ICT) क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक म्हणून गौरवले. महाराष्ट्र सरकारने स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत लेटर ऑफ इंटेंट (LOI) वर स्वाक्षरी केली असून, या वेळी स्टारलिंकच्या उपाध्यक्ष लॉरेन ड्रेयर उपस्थित होत्या.
advertisement
या भागीदारीनंतर महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे जे सरकारी संस्था, ग्रामीण भाग आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणार आहे. हा उपक्रम गडचिरोली, नंदुरबार, वाशीम आणि धाराशिव यांसारख्या दुर्गम आणि विकासाच्या दृष्टीने मागास जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, स्टारलिंक भारतात येत असून महाराष्ट्रासोबत भागीदारी करत आहे. हे राज्यासाठी सन्मानाची बाब आहे. त्यांनी स्टारलिंकला जगातील सर्वाधिक सॅटेलाइट्स असलेली आणि ICT क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हटले.
महाराष्ट्र-स्टारलिंक सहकार्यामुळे राज्याच्या “डिजिटल महाराष्ट्र” मोहिमेला नवीन गती मिळणार असून, हे उपक्रम राज्यातील ईव्ही, किनारी विकास आणि आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांशीही जोडले जातील. या निर्णयामुळे महाराष्ट्र सॅटेलाइटद्वारे सक्षम डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये देशाचे नेतृत्व करेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “डिजिटल इंडिया” मोहिमेला नवा मापदंड मिळेल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
दूरसंचार विभागाने (DoT) जून महिन्यात स्टारलिंकला ग्लोबल मोबाईल पर्सनल कम्युनिकेशन बाय सॅटेलाइट (GMPCS) परवाना दिला आहे. कंपनीने या परवान्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुरक्षा अटी पूर्ण केल्या आहेत. स्टारलिंक ही भारतात हा परवाना मिळवणारी तिसरी सॅटकॉम कंपनी ठरली आहे. यापूर्वी यूटेलसॅटची वनवेब आणि रिलायन्स जिओ या कंपन्यांना हा परवाना देण्यात आला होता.
जुलै महिन्यात केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पुष्टी केली की- एलन मस्क यांच्या नेतृत्वाखालील स्टारलिंकला भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेतील आपल्या दौर्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेट घेतली होती. ज्यामध्ये स्टारलिंकच्या भारतातील योजनांवर आणि काही सुरक्षा अटींवरील भारतीय सरकारच्या चिंतेवर चर्चा झाली होती.
या ऐतिहासिक भागीदारीमुळे महाराष्ट्र भारताच्या डिजिटल क्रांतीचे नेतृत्व करणारे पहिले राज्य ठरले आहे आणि ग्रामीण भागात हाय-स्पीड इंटरनेट पोहोचवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे.
