पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर महिलेशी संपर्क साधला. काही दिवसांच्या संवादानंतर त्याने संभाषण दुसऱ्या मेसेजिंग अॅपवर हलवले. हळूहळू भावनिक नातं निर्माण करत त्याने लग्नाचा प्रस्ताव दिला आणि अमेरिकेला नेण्याची आश्वासनं दिली.
यानंतर बनावट ‘एलॉन मस्क’ने महिलेला ‘जेम्स’ नावाच्या आणखी एका व्यक्तीशी ओळख करून दिली. जेम्सने अमेरिकेच्या व्हिसाची प्रक्रिया लवकर पूर्ण करून देण्याचं आश्वासन दिलं. विमा कंपनीत काम करणाऱ्या या महिलेला व्हिसा प्रोसेसिंगसाठी शुल्क भरण्याची गरज असल्याचं सांगण्यात आलं.
advertisement
मात्र अधिकृत फीऐवजी जेम्सने तिला अमेझॉन गिफ्ट कार्ड खरेदी करून त्यांचे कोड पाठवण्यास सांगितले. यामुळे प्रक्रिया सोपी होईल, असा दावा करत त्याने विश्वासात घेतले. ऑक्टोबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत महिलेनं वेगवेगळ्या गिफ्ट कार्ड्सवरून सुमारे 16.34 लाख रुपये खर्च केले.
15 जानेवारीला प्रकरणाला वेगळं वळण लागलं. जेम्सने यावेळी विमान तिकिटांसाठी आणखी 2 लाख रुपयांची मागणी केली. यावर महिलेला संशय आला आणि तिने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर दोघांनीही अचानक संपर्क तोडला आणि अमेरिकेला जाणं आता शक्य नसल्याचं सांगितलं.
घडलेल्या प्रकाराने धास्तावलेल्या महिलेनं पालकांना माहिती दिली. त्यांच्या सल्ल्यानुसार तिने सायबर पोलिस हेल्पलाइनकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 318 (फसवणूक), 319 (भेसळ ओळख वापरून फसवणूक) आणि 61 (गुन्हेगारी कट), तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीने स्वतःला एलॉन मस्क म्हणून सादर करून महिलेला फसवलं. याच कारणामुळे भेसळ ओळखीचे गंभीर कलम लावण्यात आले आहेत. पीडित महिलेनं क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरले होते, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.
