या टेबलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, भारतभर सध्या असे डिझाइन फक्त दीपक केळुसकर यांच्याकडेच उपलब्ध आहे. त्यांनी या उत्पादनाची संपूर्ण नोंदणी केली असून, त्याची डिझाइन आणि उत्पादन प्रक्रिया पूर्णपणे युनिक आहे.
दीपक केळुसकर यांनी 1994-95 च्या सुमारास या टेबलची निर्मिती केली. त्या काळात ते फक्त दहावी शिक्षण घेतलेले होते. नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचा त्यांचा निर्धार होता. सुरुवातीला मार्केटिंग क्षेत्रात काम करताना स्वतःचे प्रॉडक्ट असावे या विचारातून त्यांनी सुतारकाम शिकले आणि विविध वस्तू तयार केल्या. त्यातूनच या मल्टी-यूज टेबलची कल्पना साकारली.
advertisement
सुरुवातीच्या काळात हे टेबल ते सुमारे 700 रुपयाला विकत होते, ज्याचा खर्च 500 रुपये होता. आज त्याच टेबलची किंमत सुमारे 2500 रुपयापर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे, या टेबलमध्ये वापरण्यात येणारे मटेरियल उच्च दर्जाचे असून, माईल्ड स्टील स्ट्रक्चर, पावडर कोटिंग आणि मजबूत MDF बोर्डचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हे टेबल 20 ते 25 वर्षे टिकाऊ राहते, असे ग्राहक सांगतात.
याशिवाय, या टेबलवर तब्बल 300 किलोपर्यंत वजन ठेवता येते, ही एक अनोखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहे. प्रवासात देखील हे टेबल वापरण्यास सोयीचे असल्याचे सांगितले जाते. गेल्या 30 ते 35 वर्षांपासून दीपक केळुसकर हे या व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांचे स्वतंत्र दुकान नसून, ते ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून मुंबई, पुणे, कोकण आणि भारतातील इतर शहरांमध्ये आपली उत्पादने विक्रीस ठेवतात.
या व्यवसायातून आज त्यांची वार्षिक उलाढाल सुमारे 25 ते 50 लाखांपर्यंत पोहोचली आहे. मर्यादित शिक्षण असूनही जिद्द, नवकल्पना आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी उभारलेले हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.