EPFO च्या नियमानुसार, आजारपण, घर खरेदी किंवा बांधकाम, लग्न, तसेच मुलांच्या शिक्षणासाठी PF मधून पैसे काढण्याची परवानगी आहे. मात्र प्रत्येक कारणासाठी वेगवेगळ्या अटी आणि मर्यादा ठरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणत्या कारणासाठी किती रक्कम मिळू शकते, हे आधी समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.
advertisement
लग्न आणि मुलांच्या शिक्षणासाठीही PF मधून मदत मिळू शकते. स्वतःचे, मुलांचे किंवा भाऊ-बहिणींच्या लग्नासाठी नोकरीचा किमान बारा महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला असावा. या कारणासाठी कर्मचारी आणि नियोक्त्याच्या योगदानाइतकी म्हणजे शंभर टक्के रक्कम काढता येते आणि ही सुविधा पाच वेळा वापरता येते. तर मुलांच्या शिक्षणासाठी नोकरीच्या एका वर्षानंतर कर्मचारी योगदानाच्या पन्नास टक्के रक्कम व्याजासह काढता येते, आणि ही सुविधा दहा वेळा घेता येते.
गंभीर आजाराच्या उपचारासाठी PF मधून पैसे काढायचे असतील, तर कर्मचारी स्वतः, पती किंवा पत्नी, मुले किंवा पालक यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये कर्मचारी योगदान आणि त्यावरील व्याज किंवा सहा महिन्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता यापैकी जे कमी असेल तेवढी रक्कम काढता येते. विशेष म्हणजे, यासाठी कोणतीही किमान सेवा कालावधीची अट नाही. म्हणजेच नोकरीच्या सुरुवातीच्या टप्प्यातही ही मदत मिळू शकते.
घर खरेदी किंवा बांधकामासाठी PF मधून पैसे काढण्यासाठी किमान पाच वर्षांची सेवा आवश्यक आहे. यामध्ये आधीच्या नोकरीचा कालावधीही धरला जातो. घर खरेदीसाठी कर्मचारी आणि नियोक्त्याचा एकत्रित PF योगदान व त्यावरील व्याज किंवा घराची किंमत यापैकी जे कमी असेल तेवढी रक्कम मिळू शकते. तर घर बांधकामासाठी एकूण PF शिल्लकीच्या नव्वद टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येते. मात्र ही सुविधा आयुष्यात फक्त एकदाच मिळते.
