शाहपूर: सायबर ठगीचा एक अनोखा आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यात सायबर ठगांनी अत्यंत चलाखीने एका डॉक्टरची फसवणूक केली. उत्तर प्रदेशातील शाहपुर येथे राहणारे डॉक्टर जितेंद्र कुमार श्रीवास्तव हे या ठगीचे बळी ठरले असून त्यांच्याकडून तब्बल 2.5 लाख रुपये गायब झाले आहेत. याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून ही माहिती पोलिसांनी PTI ला दिली.
advertisement
डॉक्टरांना 8 सप्टेंबरला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला रुग्ण सांगितले आणि डॉक्टरांकडून फोनवरच वैद्यकीय सल्ला घेतला. डॉक्टरांनी सद्भावनेने त्याला मदत केली. सल्ला घेतल्यानंतर त्या खोट्या रुग्णाने डॉक्टरांचे आभार मानले आणि UPI द्वारे फी पाठवायची असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने डॉक्टरांकडून QR कोड मागितला. डॉक्टरांनी WhatsApp वरून तो QR कोड शेअर केला, पण इथूनच ठगांनी त्यांचा प्लॅन पूर्ण केला. काही वेळातच डॉक्टरांच्या पंजाब नॅशनल बँक खात्यातून 2,48,687 रुपये डेबिट झाले आणि डॉक्टरांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ सायबर क्राईम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, ज्यावर आधारित पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींची ओळख प्रमील कुलार आणि एस. के. रावत अशी पटवली आहे. पोलिसांनी तत्काळ संबंधित बँक खाते फ्रीज केले असून संपूर्ण व्यवहाराचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे. सायबर पोलिसांनी सांगितले की अशा ठगांपासून वाचण्यासाठी कोणालाही OTP, PIN किंवा बँकिंग माहिती शेअर करू नये. UPI पेमेंट रिक्वेस्ट अनोळखी व्यक्तीकडून आल्यास त्वरित नाकारावी. तसेच अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचा, QR कोड किंवा UPI आयडी शेअर न करण्याचा सल्ला दिला आहे. अनोळखी लिंकद्वारे मोबाइलमध्ये अॅप इंस्टॉल केल्यास सायबर ठग सहजपणे तुमची बँक आणि फोन माहिती चोरू शकतात, म्हणून ही मोठी फसवणुकीची युक्ती असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
