कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यास त्याचा सर्वात थेट परिणाम ऑइल आणि एनर्जी क्षेत्रावर होतो. अपस्ट्रीम कंपन्या ज्या कच्चे तेल शोधणे आणि उत्पादन करणे यामध्ये कार्यरत आहेत, त्यांना दरवाढीचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे Oil and Natural Gas Corporation (ONGC) आणि Oil India Limited यांसारख्या कंपन्यांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असेल. मात्र रिफायनिंग कंपन्यांवर दबाव वाढू शकतो, कारण महाग कच्चे तेल त्यांच्या नफ्याच्या मार्जिनवर परिणाम करते. Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL), Bharat Petroleum Corporation Limited (BPCL) आणि Indian Oil Corporation यांचे शेअर्स दबावाखाली राहू शकतात.
advertisement
मिडल ईस्टमधील वाढत्या तणावामुळे एअरस्पेस बंद होणे किंवा उड्डाणे रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे एव्हिएशन कंपन्यांवर परिणाम होऊ शकतो. IndiGo आणि SpiceJet यांचे शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील. त्याचप्रमाणे पर्यटन आणि हॉटेल उद्योगावरही परिणाम जाणवू शकतो. Indian Hotels Company Limited, Ixigo आणि Yatra Online यांसारख्या कंपन्यांमध्येही हालचाल दिसू शकते.
भूराजकीय तणाव वाढला की गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतात आणि त्यामुळे सोने-चांदीच्या किंमती वाढण्याची शक्यता असते. याचा फायदा गोल्ड फायनान्स कंपन्यांना होऊ शकतो. Manappuram Finance आणि Muthoot Finance यांचे शेअर्स चर्चेत राहू शकतात. तसेच ज्वेलरी क्षेत्रातील Titan Company आणि Kalyan Jewellers यांच्याकडेही बाजाराचे लक्ष राहील.
डॉलर मजबूत झाल्यास मेटल क्षेत्रावर दबाव येऊ शकतो. गेल्या महिन्यात तेजी दाखवलेल्या Tata Steel आणि Vedanta Limited यांसारख्या शेअर्समध्ये चढ-उतार दिसू शकतात.
दरम्यान इंडोनेशियाने ट्रक्सचा मोठा ऑर्डर थांबवल्याच्या बातम्यांमुळे ऑटो क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः कमर्शियल व्हेइकल व्यवसायात मोठा वाटा असलेल्या Tata Motors आणि Mahindra & Mahindra यांचे शेअर्स फोकसमध्ये राहतील.
मिडल ईस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवसाय असलेल्या कंपन्यांवरही बाजाराची नजर असेल. Larsen & Toubro, Welspun Corp आणि KEC International यांच्यातही अस्थिरता दिसू शकते.
मध्यपूर्वेतील वाढता तणाव, कच्च्या तेलाच्या किंमतीतील संभाव्य वाढ आणि जागतिक बाजारातील अनिश्चितता यामुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठ्या हालचाली होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांनी सेक्टरनिहाय घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे ठरेल.
