Gold Price: यंदाच्या दिवाळीत सोन्याने चांगलाच उच्चांक गाठला आहे. सोन्याच्या दरात आलेल्या तेजीने शेअर बाजारालादेखील मागे सारले आहे. या वर्षात 2025 मध्ये सोन्याच्या दरात जवळपास 67 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील सोन्याच्या दराने आतापर्यंतचा विक्रमी दर गाठला आहे. भारतातील सोन्याच्या किमती प्रति 10 ग्रॅम 1,28,000 या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचल्या आहेत. या वाढीमुळे गुंतवणूकदारांमध्ये आता नवी उत्सुकता निर्माण झाली आहे. सोन्याचा दर हा प्रति तोळा तीन लाखांचा दर गाठेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
advertisement
एक्सपर्ट म्हणतात, मागच्या 100 वर्षात झालं नाही ते...
'बिझनेस टुडे'च्या वृत्तानुसार, सेबी-नोंदणीकृत संशोधन विश्लेषक राहुल जैन म्हणाले की सोन्याच्या किमतीत इतकी मोठी वाढ गेल्या 100 वर्षांत कधीही झालेली नाही. सोन्याच्या किमती फक्त 18 महिन्यांत दुप्पट झाल्या. सोन्याच्या दरातील तेजीचं मोठं आणि महत्त्वाचं कारण हे कोणतीही केंद्रीय बँक नव्हे तर खाजगी गुंतवणूकदार असल्याचे त्यांनी सांगितले.
यंदाच्या वर्षात 64 अब्ज डॉलर्सचे ईटीएफ
समोर आलेल्या माहितीनुसार, 2025 या वर्षात आतापर्यंत सोन्याच्या ईटीएफमध्ये 64 अब्ज डॉलर्सचा ओघ दिसून आला आहे. ही रक्कम 2024 च्या तुलनेत चार पट अधिक आहे. यातील 50 टक्के रक्कम ही फक्त उत्तर अमेरिकेतून आली आहे. डॉलरमध्ये आलेला कमकुवतपणा आणि व्याज दर कपात अशा वेगवेगळ्या कारणांनी उत्तर अमेरिकेतील गुंतवणुकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक केली.
या देशांनी खरेदी केलं 70 टन सोनं
2023 च्या तुलनेत मध्यवर्ती बँकांच्या खरेदीत थोडीशी घट झाली असली तरी, पोलंड, चीन, तुर्की आणि कझाकस्तान सारख्या देशांनी आतापर्यंत 70 टन सोने घेतलं आहे. जर 2026-27 पर्यंत भू-राजकीय तणाव कायम राहिला तर मध्यवर्ती बँकेची मागणी पुन्हा वाढू शकते, असेही तज्ज्ञांनी म्हटले.
वृत्तानुसार, राहुल जैन यांनी सांगितले की, लाँग टर्मचा विचार केल्यास प्रति 10 ग्रॅम 3 लाखांपर्यंतचा सोन्याचा दर शक्य आहे. मात्र, सध्या सोनं हे त्याच्या 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीपेक्षा खूपच जास्त आहे, ज्यामुळे अल्पकालीन सुधारणा होण्याची शक्यता आहे, म्हणजेच त्यात घट होई शकते. सोनं आता उच्च दरात खरेदी न करण्याचा सल्ला त्यांनी दिला. मात्र, एकरकमी खरेदी न करता एसआयपी किंवा टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
सोने ही अजूनही एक मजबूत दीर्घकालीन गुंतवणूक ठरू शकते. काही चढउतार असूनही, 2030 पर्यंत सोन्याची किंमत 3 लाख रुपयांपर्यंत पोहचण्याची दाट शक्यता असल्याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधलं.
(Disclaimer: या बातमीत दिलेली माहिती ही एक्सपर्ट/ब्रोकरेज फर्म यांचे वैयक्तिक विचार आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ही बातमी कोणताही गुंतवणूकविषयक सल्ला नाही.)