मुंबई: येत्या काही महिन्यांत सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. लक्ष्मी डायमंड्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक चेतन मेहता यांनी सीएनबीसी टीव्ही18 ला दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीनंतर सोन्याच्या दरात (Gold Price Prediction) आधीच 10 ते 15 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे आणि पुढील दोन ते तीन महिन्यांत यात आणखी 10 ते 20 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते आंतरराष्ट्रीय स्तरावर मध्यवर्ती बँका आणि मोठ्या गुंतवणूकदारांकडून वाढती खरेदी सोन्याच्या दरांना सातत्याने आधार देत आहे.
advertisement
मेहता यांनी स्पष्ट केले की, यावर्षी सोन्याची गुंतवणूक म्हणून केलेली खरेदी दागिन्यांच्या तुलनेत अधिक मजबूत राहिली आहे. मात्र त्यांनी हे देखील नमूद केले की, लग्नाच्या हंगामाच्या सुरुवातीमुळे दागिन्यांची खरेदी पुन्हा वेग पकडेल. दिवाळीच्या काळात विक्री चांगली झाली होती; पण त्यानंतर सुमारे 10 ते 15 दिवस बाजारात काहीशी मंदी होती. आता पुन्हा मागणी वाढू लागली आहे.
यावेळेस जुन्या सोन्याच्या एक्सचेंजमध्ये (बदलण्यात) सर्वात मोठा बदल दिसून आला आहे. दिवाळीच्या वेळी 40 ते 50 टक्क्यांपर्यंत ग्राहक जुने सोने बदलून नवीन दागिने खरेदी करत होते. मेहता यांच्या अंदाजानुसार, सध्याच्या तिमाहीत हा हिस्सा सुमारे 20 ते 25 टक्के राहू शकतो. लोक आपले जुने सोने बदलून मोठे आणि जड डिझाइनचे दागिने खरेदी करण्याकडे वेगाने वळत आहेत.
हिऱ्यांच्या दागिन्यांची वाढती मागणी:
हिऱ्यांच्या दागिन्यांच्या (Diamond Jewellery) मागणीबद्दल बोलताना मेहता म्हणाले की, बाजार स्थिर आहे. स्टडेड (जडवलेल्या) दागिन्यांची मागणी पूर्वीप्रमाणेच मजबूत आहे. मात्र मोठ्या आकाराच्या सॉलिटेअर हिऱ्यांची विक्री काहीशी कमी झाली आहे, पण लहान आणि मध्यम वजनाच्या हिऱ्यांची खरेदी चांगली सुरू आहे.
ग्राहक आता प्लेन सोन्याऐवजी हिऱ्यांचे दागिने पसंत करत आहेत, कारण ते परिधान करण्यास सोपे असतात आणि त्यांचा वापर जास्त काळ करता येतो. मेहता यांनी स्पष्ट केले की- जागतिक खरेदी आणि देशांतर्गत मागणी दोन्ही मिळून येत्या काळात सोन्याच्या किमतींना उच्च पातळीवर घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे गुंतवणूकदार आणि खरेदीदारांसाठी पुढील महिने खूप महत्त्वाचे ठरणार आहेत.
