सीएनबीसी TV18 च्या रिपोर्टनुसार, बुधवार (16 ऑक्टोबर 2024) भारतात सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या. जागतिक बाजारातली मागणी आणि देशातल्या सणांमुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डची किंमत 0.3% ने वाढून $2,667.97 (जवळपास 2,22,000 प्रति औंस) झाली. भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,390 प्रति 10 ग्रॅम झाली आहे.
advertisement
सोन्याच्या किमती वाढण्याची कारणं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढण्याची कारणं बरीच आहेत. सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिकेच्या ट्रेझरी यील्डमध्ये घसरण आहे. 10 वर्षांच्या ट्रेझरी यील्डमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाल्याने सोन्यासारख्या व्याज नसलेली संपत्ती जास्त आकर्षक झाल्या. यूएस फेडरल रिझर्व्ह भविष्यात व्याजदरात कपात करील या आशेवर आधारित ही घसरण आहे.
ANZ कमॉडिटी स्ट्रॅटेजिस्ट सोनी कुमारी यांच्या मते, "यूएस मौद्रिक धोरणातील ढील सोन्याच्या किमतींसाठी एक गेम चेंजर आहे कारण यामुळे गुंतवणुकीची मागणी वाढते." तसंच मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळेही सोन्याची मागणी वाढतेय. ऑगमाँट-गोल्ड फॉर ऑलच्या प्रमुख रिसर्चर रेनिशा चैनानी म्हणाल्या, "भू-राजकीय धोक्यांमध्ये जोखीम नसलेल्या सेंटिमेंटमुळे सोन्याकडे सुरक्षित गुंतवणुकीचा कल वाढत आहे."
भारतातल्या सणांचा परिणाम
भारत जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा उपभोक्ता आहे. दिवाळी आणि धनत्रयोदशी या काळात भारतात सोन्याची मागणी वाढते. ज्वेलर्स आणि व्यापाऱ्यांकडून खूप मागणी असल्याने सोन्याच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे, असं कामा ज्वेलरीचे एमडी कॉलिन शाह म्हणाले. त्यांच्या मते "या सणासुदीच्या काळात सोन्याच्या मागणीत आम्हाला वार्षिक 10-15% वाढ अपेक्षित आहे." मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा ग्राहकांची मागणी जास्त आहे. त्यामुळे सोन्याचे दर नवा उच्चांक गाठतील, असा अंदाज शाह यांनी व्यक्त केला.
भविष्यातली शक्यता
लंडन बुलियन मार्केट असोसिएशनच्या वार्षिक संमेलनात तज्ज्ञांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार, पुढच्या 12 महिन्यांत सोन्याचे दर 2,941$ (सुमारे 2,45,000 प्रति औंस) जाण्याची शक्यता आहे. जागतिक कल अनुकूल राहिल्यास सोन्याची किंमत 78,500 प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकते, असं रेनिशा चैनानी म्हणाल्या.
