सोनं 4 हजार तर चांदी 10 हजार रुपयांनी स्वस्त
बुधवारी भारतात २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमच्या किमतीत तब्बल ४००० रुपयांहून अधिकची तर चांदीच्या किमतीत प्रति किलो सुमारे १०,६०० रुपयांची मोठी घसरण पाहायला मिळाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव १,२७,६३३ वरून कमी होऊन १,२३,९०७ रुपयांवर पोहोचला. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १,१३,४९९ पर्यंत, तर १८ कॅरेट सोन्याचा भाव ९२,९३० पर्यंत घसरल्याचं बाजारात पाहायला मिळालं.
advertisement
चांदीच्या किमतीत ऐतिहासिक घसरण
सोनेच नाही, तर चांदीच्या किमतीतही मोठी घसरण झाली आहे. चांदीचा दर प्रति किलो १,६३,०५० वरून थेट १,५२,५०१ पर्यंत खाली आला आहे, म्हणजेच चांदीच्या दरात तब्बल १०,५४९ रुपयांची घट झाली. दिवाळीमुळे मंगळवारी सराफा बाजार बंद होता, यापूर्वीचे शेवटचे दर सोमवारी जाहीर झाले होते. हाजिर बाजारासोबतच वायदा बाजारात (MCX) देखील सोन्याचे दर ५.२१ टक्क्यांनी तर चांदीचे दर ३.०९ टक्क्यांनी घसरल्याचं पाहायला मिळालं.
Husband Wife : माझ्यावर आई-बाबांची जबाबदारी, मग 45,000 कमावणाऱ्या डॉक्टर बायकोला पोटगी का देऊ? कोर्टाचा निर्णय ठरला चर्चेचा विषय
आणखी घसरणीची शक्यता
जाणकारांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात अजूनही सोने आणि चांदीचे दर घसरत आहेत. कॉमैक्सवर सोन्यात १.५६ टक्क्यांची, तर चांदीत ०.२९ टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. यामुळेच, तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला की, २३ ऑक्टोबर रोजी देखील भारतीय बाजारात सोने-चांदीच्या किमतीत आणखी मोठी घसरण पाहायला मिळू शकते. त्यामुळे सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही खऱ्या अर्थाने 'सुवर्णसंधी' ठरू शकते.
दरातील घसरणीचे कारण काय?
सोन्या-चांदीच्या दरात एवढी मोठी घसरण होण्यामागे जागतिक कारणे आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर मौल्यवान धातूंचा पुरवठा वाढल्यामुळे त्यांच्या किमती कमी झाल्या आहेत. यासोबतच, जागतिक बाजारपेठेत स्थिरतेचे संकेत मिळणे आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफबद्दल घेतलेला मवाळ पवित्रा ही देखील या घसरणीमागील प्रमुख कारणे मानली जात आहेत. त्यामुळे आता विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोन्या-चांदीचे दर आणखी किती खाली येतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.