सोनं आणि चांदीच्या भावाने गेल्या काही दिवसांपासून जो उच्छाद मांडला होता, त्याला आता कुठेतरी लगाम बसताना दिसत आहे. ज्यांच्या घरात लग्नकार्य आहे किंवा जे गुंतवणुकीसाठी सोन्याच्या किमती कमी होण्याची वाट पाहत होते, त्यांच्यासाठी हा आठवडा मोठा दिलासा घेऊन आला आहे.
अनेकांना प्रश्न पडला असेल की, अचानक असं काय झालं की सोन्याचे भाव इतके कोसळले? यामागे जागतिक स्तरावरची काही महत्त्वाची कारणं आहेत. एक तर आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरची ताकद वाढली आहे. जेव्हा डॉलर मजबूत होतो, तेव्हा सोन्याचे भाव कमी होतात, हे साधं गणित आहे. दुसरीकडे, कच्च्या तेलाच्या किमती ४ वर्षांतील उच्चांकी पातळीवर गेल्या आहेत.
advertisement
यामुळे जगभरातील बँकांनी व्याजाचे दर वाढवण्याचे संकेत दिले आहेत. जेव्हा बँकांमध्ये चांगला परतावा मिळतो, तेव्हा गुंतवणूकदार सोन्यातले पैसे काढून तिथे गुंतवतात. त्याचाच परिणाम आता आपल्याला पाहायला मिळतोय.
पाच वर्षांतील मोठी पडझड
जानेवारी २०२६ पासूनचा हा असा पहिला आठवडा आहे, ज्यात सोन्याचे भाव इतक्या वेगाने खाली आले आहेत. शुक्रवारी बाजार बंद होताना सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४५,५७० रुपयांच्या आसपास होता. मार्च महिना सुरू झाल्यापासून सोन्याची झळाळी १५ हजार रुपयांनी उतरली आहे. ही घसरण अशीच सुरू राहिली, तर येत्या काही दिवसांत सोनं आणखी स्वस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सोन्या-चांदीचे दर
२४ कॅरेट सोन्याचे दर - १४९८५६
२३ कॅरेट सोन्याचे दर- १४३६१२
२२ कॅरेट सोन्याचे दर- १३७३६४
२० कॅरेट सोन्याचे दर- १२४८७९
१८ कॅरेट सोन्याचे दर - ११२३९२
चांदीचीही तिच अवस्था
चांदीच्या बाबतीत सांगायचं तर, शुक्रवारी चांदीचा दर प्रति किलो २,२८,८७१ रुपयांवर आला. एकाच आठवड्यात चांदीने गुंतवणूकदारांचे जवळपास ३० हजार रुपये बुडवले आहेत. सध्या सोन्या-चांदीच्या बाजारात मोठी अनिश्चितता आहे. पण जे ग्राहक 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत होते, त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी असू शकते. मात्र, गुंतवणूक करण्यापूर्वी बाजाराचा कल पाहणं केव्हाही उत्तम.
