इराणच्या अणुप्रकल्पावर डागले मिसाइल, युद्धात रशियाची एन्ट्री? अमेरिका-इस्त्रायलला दिला इशारा
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मध्यपूर्वेतील संघर्ष आता वाढतच चालला आहे. त्याचे जगभरात पडसाद उमटत आहेत. आता रशियाने थेट अमेरिका आणि इस्त्रायलला इशारा दिला आहे.
मध्यपूर्वेतील संघर्ष आता वाढतच चालला आहे. त्याचे जगभरात पडसाद उमटत आहेत. तेलाच्या किमती गगनाला भीडत आहेत. नॅचरल गॅसचा देखील तुडवडा निर्माण झाला आहे. असं असताना आता आखाती राष्ट्रांना हादरवून सोडणारी एक बातमी समोर आली आहे. इराणच्या 'बुशेहर' अणुऊर्जा प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ला झाला आहे. या हल्ल्याची माहिती समोर येताच संयुक्त राष्ट्रांची अणु निरीक्षक संस्था अर्थात IAEA ने अलर्ट जारी केला आहे. याशिवाय, रशियाने देखील यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. रशियाने अमेरिका आणि इस्रायलला कडक शब्दांत इशारा दिला आहे.
इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला
बुधवारी रात्री उशिरा इराणच्या बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला आहे. सुदैवाची बाब म्हणजे या हल्ल्यात प्रकल्पाचं कोणतंही मोठं नुकसान झालं नाही, तसेच कोणतीही जीवितहानीही झाली नाही. मात्र या कृतीमुळे जगभरातील अणु-तज्ज्ञांचा श्वास रोखला गेला आहे. हा हल्ला अशा वेळी घडला, जेव्हा इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांकडून केलेली एक छोटी चूकही संपूर्ण प्रदेशाला रेडिओलॉजिकल नरकात लोटू शकते.
advertisement
IAEA कडून सावधगिरीचा इशारा
संयुक्त राष्ट्रांची अणु-निरीक्षक संस्था असलेल्या IAEA ने या गोष्टीला दुजोरा दिला आहे की, इराणने या हल्ल्याबाबत संस्थेला अधिकृतपणे माहिती दिली आहे. बुशेहर प्रकल्प हा इराणचा सध्या कार्यरत असलेला एकमेव अणुभट्टी प्रकल्प आहे. जर हे क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या मुख्य गाभ्यावर आदळले असते, तर किरणोत्सर्ग केवळ इराणपुरता मर्यादित न राहता, अनेक शेजारील देशांमध्येही पसरला असता. IAEA चे महासंचालक राफेल ग्रोसी यांनी संभाव्य अणु-विपत्ती टाळण्यासाठी सर्वांनी संयम बाळगावा, असं आवाहन केलं आहे.
advertisement
रशियाचा अमेरिका इस्त्रायला थेट इशारा
या हल्ल्यावर रशियाने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पाची उभारणी रशियाच्या मदतीने करण्यात आली होती आणि आजही रशियन अभियंते आणि कर्मचारी तिथे कार्यरत आहेत. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी या घटनेचा निषेध केला आहे. अणुऊर्जा प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याची बेपर्वाई कुणीही करू नये, असा थेट इशारा रशियाने अमेरिका आणि इस्रायलला दिला आहे. या प्रकल्पावर तैनात असलेल्या आपल्या नागरिकांच्या जीवाला कोणताही धोका निर्माण झाल्यास, त्याचे अत्यंत गंभीर परिणाम भोगावे लागतील, असं रशियाने म्हटलं आहे.
advertisement
बुशेहर अणुऊर्जा प्रकल्प महत्त्वाचा का आहे?
नैऋत्य इराणमध्ये स्थित असलेला हा प्रकल्प देशातील एकमेव अणुऊर्जा प्रकल्प आहे. २०११ पासून तो राष्ट्रीय वीज नेटवर्कशी जोडलेला आहे. २०१८ मध्ये अमेरिकेने अणुकरारातून माघार घेतल्यापासून, हा प्रकल्प सातत्याने आंतरराष्ट्रीय वादांच्या केंद्रस्थानी राहिला आहे. इराणने नेहमीच अशी भूमिका घेतली आहे की, आपला अणुऊर्जा प्रोग्राम केवळ शांततापूर्ण उद्देशांसाठी आहे; तर दुसरीकडे, अमेरिकेनं मात्र याचा संभाव्य गैरवापर केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवत, त्याबाबत नेहमीच संशय व्यक्त केला आहे.
Location :
Delhi
First Published :
Mar 19, 2026 7:08 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
इराणच्या अणुप्रकल्पावर डागले मिसाइल, युद्धात रशियाची एन्ट्री? अमेरिका-इस्त्रायलला दिला इशारा







