सामान्य भाविकांना बंदी, मग खासदारांना एन्ट्री कशी? भीमाशंकर मंदिर प्रकरणावरून पोलीस अन् विश्वस्त अडकले, मोठा दणका
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
अगदी महाशिवरात्रीलाही भाविकांना लांबूनच दर्शन घ्यावे लागले होते. मात्र, खासदार निशिकांत दुबे यांनी या नियमांना केराची टोपली दाखवत मंदिरात प्रवेश केला.
पुणे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांना दर्शनासाठी काही काळासाठी बंद आहे. मात्र, अशातही भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी बेकायदेशीरपणे दर्शन घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत खेडच्या प्रांताधिकाऱ्यांनी मंदिराचे विश्वस्त आणि संबंधित पोलीस निरीक्षकांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर मंदिर परिसरात सध्या सभामंडप आणि भाविकांच्या सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव जानेवारी महिन्यापासून भाविकांसाठी मंदिर प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. अगदी महाशिवरात्रीलाही भाविकांना लांबूनच दर्शन घ्यावे लागले होते. मात्र, शनिवारी दुपारी खासदार निशिकांत दुबे यांनी या नियमांना केराची टोपली दाखवत मंदिरात प्रवेश केला.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, दुबे यांचे हेलिकॉप्टर खेडमधील एका खासगी जागेत उतरले. तेथून ते मोटारीने भीमाशंकरला पोहोचले. पोलिसांनी लावलेले दोन सुरक्षिततेचे बॅरिकेड्स पार करून त्यांची गाडी थेट मंदिरापर्यंत गेली. 'आम्ही परिसराचे सर्वेक्षण करत आहोत' असे सांगून ते मंदिराजवळ आले. त्यानंतर मंदिराच्या विश्वस्तांनी प्रवेशद्वाराचे कुलूप उघडले आणि दुपारी आरतीच्या वेळी खासदारांना गाभाऱ्यात प्रवेश देऊन दर्शन घडवले.
advertisement
जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश
नियम धाब्यावर बसवून झालेल्या या 'व्हीआयपी' दर्शनामुळे सर्वसामान्य भाविकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हा प्रशासनावर टीकेची झोड उठल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार प्रांताधिकारी अनिल दौंडे यांनी आता मंदिर प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला जाब विचारला आहे. नियमांचे उल्लंघन का झाले, याचे स्पष्टीकरण आता संबंधितांना द्यावे लागणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 18, 2026 7:09 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
सामान्य भाविकांना बंदी, मग खासदारांना एन्ट्री कशी? भीमाशंकर मंदिर प्रकरणावरून पोलीस अन् विश्वस्त अडकले, मोठा दणका









