सोलापुरात दुहेरी मर्डर, 2 पुतण्यांनी घरात घुसून काका-काकूंना संपवलं, धक्कादायक कारण समोर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Solapur News: सोलापूर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं दोन सख्ख्या पुतण्यांनी आपल्या काका आणि काकूची निर्घृण हत्या केली आहे.
प्रीतम पंडित, प्रतिनिधी सोलापूर: सोलापूर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं दोन सख्ख्या पुतण्यांनी आपल्या काका आणि काकूची उशीने तोंड दाबून निर्घृण हत्या केली आहे. सोलापूरच्या एमआयडीसी पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत अवघ्या २४ तासांच्या आत या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा केला असून दोन्ही आरोपी पुतण्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
सोलापूरमधील कृष्णा नगर भागात महादेव मंचाळ आणि रंगम्मा मंचाळ हे वृद्ध दाम्पत्य वास्तव्यास होते. महादेव मंचाळ हे अर्धांगवायूने आजारी असल्यामुळे अंथरुणाला खिळून होते. त्यांचा पुतणे राहुल रामचंद्र मंचाळ आणि विकास रामचंद्र मंचाळ यांच्यासोबत संपत्तीचा वाद सुरू होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर दोन्ही पुतण्यांनी त्यांचा काटा काढण्याचं ठरवलं. मध्यरात्रीच्या सुमारास या दोघांनी घरात शिरून काका आणि काकूच्या तोंडावर उशी ठेवून त्यांची हत्या केली.
advertisement
चोरीचा बनाव फसला
हत्या केल्यानंतर हे प्रकरण अंगाशी येऊ नये, यासाठी दोन्ही पुतण्यांनी घरात चोरी झाल्याचा बनाव रचला. घरातील सामान अस्ताव्यस्त करून त्यांनी हा दरोड्याचा प्रकार असल्याचं भासवलं. मात्र, घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना सुरुवातीपासूनच घरच्यांच्या हालचालींवर संशय आला होता. तपासाची चक्रं वेगानं फिरवत पोलिसांनी राहुल आणि विकास यांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
advertisement
तीन महिन्यांपूर्वीचे भांडण ठरले कारण
पोलीस तपासात समोर आले की, काका-काकू ज्या जागेवर राहत होते, त्या मालमत्तेवरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. सुमारे तीन महिन्यांपूर्वी या जागेवरून दोन्ही कुटुंबांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. याच वादाचा राग मनात धरून आरोपींनी संपूर्ण मालमत्ता हडपण्याच्या उद्देशाने हा भयंकर कट रचला.
एमआयडीसी पोलिसांनी राहुल रामचंद्र मंचाळ आणि विकास रामचंद्र मंचाळ या दोन्ही आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. अवघ्या २४ तासांत या गुन्ह्याचा छडा लावला आहे. या घटनेमुळे सोलापूर शहरात खळबळ उडाली आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Mar 17, 2026 11:15 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सोलापुरात दुहेरी मर्डर, 2 पुतण्यांनी घरात घुसून काका-काकूंना संपवलं, धक्कादायक कारण समोर








