धक्कादायक! 'जीव दे नाहीतर..'; प्रेयसीच्या आईची धमकी, मुंबईत पोलिसानं आयुष्य संपवलं
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
प्रेयसीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या मानसिक त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून एका तरुण पोलीस शिपायानं आपलं जीवन संपवलं आहे.
मुंबई पोलीस दलातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या मानसिक त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून एका तरुण पोलीस शिपायानं आपलं जीवन संपवलं आहे. "जीव दे, नाहीतर तुझी नोकरी घालवू," अशा शब्दांत प्रेयसीच्या आई-वडिलांनी धमकी दिल्यामुळे या पोलिसानं टोकाचं पाऊल उचललं. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
नेमकी घटना काय?
भैयासाब भीमराव व्हावळे (वय ३२) असं आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. भैयासाब यांची ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई पोलीस दलात चालक पदावर नियुक्ती झाली होती. ते कलिना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात आपले प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण करत होते. मात्र, १५ मार्च रोजी सकाळी त्यांनी प्रशिक्षण केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांनी परभणीहून मुंबई गाठली.
advertisement
सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा
पोलिसांना भैयासाब यांच्या खिशात एक चिठ्ठी (सुसाईड नोट) सापडली आहे. या चिठ्ठीत त्यांनी आपल्या मृत्यूचं कारण स्पष्टपणे नमूद केले आहे. भैयासाब यांचे नांदेड जिल्ह्यातील हादगाव येथील दिव्या नावाच्या एका मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र, या संबंधांना मुलीच्या घरच्यांचा तीव्र विरोध होता. "दिव्याच्या वडिलांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली, तर तिच्या आईने 'जीव दे नाहीतर तुझी नोकरी घालवतो' असं म्हणत मानसिक छळ केला. त्यांच्या सततच्या धमक्यांमुळे मी आत्महत्या करत आहे," असं पोलिसाने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
advertisement
भैयासाब यांचे वडील भीमराव व्हावळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी दिव्याच्या आई आणि वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मिळालेली सुसाईड नोट ही भैयासाब यांच्याच हस्ताक्षरातील असल्याचे त्यांच्या वडिलांनी ओळखले आहे. मात्र, कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून पोलीस आता फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेणार आहेत. हस्ताक्षराचा अहवाल आल्यानंतर आरोपींवरील पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती आहे. नुकतीच नोकरी लागलेल्या एका तरुण पोलीस कर्मचाऱ्याने अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 18, 2026 7:04 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
धक्कादायक! 'जीव दे नाहीतर..'; प्रेयसीच्या आईची धमकी, मुंबईत पोलिसानं आयुष्य संपवलं









