दिल्ली : सध्या डिजिटल पेमेंटचे जग आहे. त्यामुळे अनेकजण रोख रक्कम ठेवत नाहीत. आता लोक वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात जाताना मोबाईल घेऊन जातात आणि प्रत्येकजण ऑनलाइन पेमेंट करत आहे. मोठ्या शोरूमपासून ते लहान रस्त्यावरील दुकानदारही आता ऑनलाइन पेमेंटची सुविधा ठेवत आहेत.
तुम्ही यूपीआय पेमेंट करताना, दुकानांवर लावलेले क्यूआर कोड पाहिले असतील. हे क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तुम्ही पेमेंट करता. यातून थेट पैसे हे दुकानदाराच्या खात्यात जातात. मात्र, अनेक लहान मोठ्या दुकानदारांना अजूनही माहिती नाही की, हा क्यूआर कोड त्यांना कसा मिळेल? तर क्यूआर कोड मिळवणे अवघड काम नाही.
advertisement
तुम्ही यासाठी काही पायऱ्या फॉलो केल्या तर तुम्ही तुमचा स्वतःचा क्यूआर कोड तयार करू शकता. तसेच सहजपणे पेमेंट स्विकारू शकता. म्हणून मग क्यूआर कोड कसा तयार करावा, याबाबत अगदी सोप्या शब्दात पूर्ण माहिती जाणून घेऊयात.
काळ्या आणि पांढऱ्या चौरसांनी बनलेला क्यूआर कोड किंवा क्विक रिस्पांस कोड द्विमितीय असणाऱ्या मशीनच्या सहाय्याने वाचला जातो. हा क्यूआर कोड स्मार्टफोन कॅमेऱ्याने वाचता येतो. मास्टर कार्ड, अमेरिकन एक्सप्रेस आणि व्हिसासारख्या पेमेंट नेटवर्कने भारत क्यूआर पेमेंट सिस्टम लाँच आणि प्रोत्साहन देण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) सोबत सहयोग केला आहे. देशभरातील विविध व्यवसाय केंद्रांवर वेगवेगळे क्यूआर कोड वापरले जातात.
असे करा डाऊनलोड -
जर तुम्हालाही तुमचा क्यूआर कोड तयार करायचा असेल तर तुम्हाला यूपीआय पेमेंट अॅप्स डाऊनलोड करुन आपल्या बँक खात्यासोबत लिंक करावे लागेल. यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीने क्यूआर कोड डाऊनलोड करू शकतात. याला डाऊनलोड करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागणार नाही. हे नि:शुल्क आहे. अनेकजण पेटीएमचा वापर करतात. यासाठी त्या लोकांना पेटीएम बिझनेस ॲपद्वारे क्यूआर कोड डाउनलोड करावा लागेल.
नेमकं काय करावं -
⦁ प्रथम, तुमचे बँक खाते असल्याची खात्री करा
⦁ तुमचे बँक खाते पेमेंट ॲपशी लिंक करा
⦁ पेमेंट ॲपवरून तुमचा युनिक भारत QR कोड जनरेट करा
⦁ QR कोड प्रिंट करा आणि पेमेंट काउंटरच्या भिंतीवर चिकटवा
⦁ यानंतर, ग्राहक तुमचा QR कोड स्कॅन करून सहजपणे पैसे देऊ शकतात.