टू व्हीलर चालवताना त्या गाडीची वैध इन्शुरन्स पॉलिसी असणं भारतात खूप महत्त्वाचं आहे. त्याशिवाय टू व्हीलर चालविणे बेकायदेशीर मानलं जातं. कोणतीही शारीरिक इजा किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास टू व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीद्वारे आर्थिक संरक्षण दिलं जातं. अपघातात झालेल्या शारीरिक दुखापतीसह, पादचारी व्यक्ती, गाडीवर मागे बसलेली व्यक्ती आणि गाडी चालवणारी व्यक्ती असं सर्वांना यामुळे संरक्षण मिळते. टू व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी ही मुळात विमा कंपनी आणि व्यक्ती यांच्यातील एक करार आहे, ज्यामध्ये विमा कंपनी अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा गाडी चोरीला गेल्यानंतर होणारं नुकसान कव्हर करते. चला तर, टू व्हीलर इन्शुरन्स का आवश्यक आहे, ते जाणून घेऊ.
advertisement
ऑनलाइन काढता येईल पॉलिसी
टू व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीचा एक फायदा म्हणजे तुम्ही ‘नो क्लेम बोनस’ (एनसीबी) सारखे फायदे घेऊ शकता. तुम्ही ऑनलाइन देखील ही पॉलिसी खरेदी करू शकता. जर तुमच्या पॉलिसीची मुदत संपली असेल, तर तुम्हाला तुमच्या गाडीचे होणारं नुकसान सोसावं लागेल. त्यामुळे इन्शुरन्सचं नूतनीकरण नेहमी वेळेवर करून घ्या.
वैयक्तिक अपघात कव्हर
जर तुम्ही पॉलिसी धारक असाल, व टू व्हीलर चालवताना झालेल्या अपघातामुळे तुम्हाला कायमचे अपंगत्व आल्यास इन्शुरन्स कंपनी तुम्हाला ठराविक रकमेपर्यंत भरपाई देईल. जर अपघातात पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला इन्शुरन्स कंपनीकडून पॉलिसीची रक्कम दिली जाईल.
कायदेशीर संरक्षण
रस्त्यावर गाडी चालवताना, त्या गाडीची इन्शुरन्स पॉलिसी असणं महत्त्वाचं आहे. तुमच्या वाहनाची इन्शुरन्स पॉलिसी असेल, तर तुम्हाला यासाठी आकारण्यात येणारा दंड भरण्यापासून कायदेशीररित्या संरक्षण मिळू शकेल.
खर्चाची चिंता मिटेल
जर तुमच्या बाईक किंवा स्कूटरचे अपघातात नुकसान झाले, ती खराब झाली किंवा चोरीला गेली, तर ती दुरुस्त करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी येणाऱ्या खर्चाची चिंता तुम्हाला करण्याची गरज नाही. कारण हा खर्च इन्शुरन्स कंपनी करेल.
दरम्यान, प्रत्येक वाहन चालकाने त्याच्या गाडीचा इन्शुरन्स उतरवणे आवश्यक आहे. तसेच वाहनासाठी इन्शुरन्स निवडताना त्याचे फायदेही लक्षात घेणं महत्वाचं आहे.