Muthoot FinCorp आणि Jefferies India यांच्या अहवालानुसार नोव्हेंबर 2025 पर्यंत भारतातील गोल्ड लोन क्षेत्रात वार्षिक आधारावर 42 टक्क्यांची वाढ झाली असून, एकूण बाजारपेठ सुमारे 15.6 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या दागिन्यांच्या तारणावर दिल्या जाणाऱ्या किरकोळ (रिटेल) कर्जांमध्ये 93 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. तर बँकांकडून वितरित करण्यात आलेल्या गोल्ड लोनमध्ये तब्बल 127 टक्क्यांची उसळी दिसून आली आहे.
advertisement
सोन्याच्या वाढत्या किमती आणि ग्राहकांची वाढती मागणी यामुळे या क्षेत्राला मोठा चालना मिळाला आहे. घरगुती ग्राहक, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME), किरकोळ व्यापारी आणि शेतकरी आता गोल्ड लोनकडे शेवटचा पर्याय म्हणून नव्हे, तर नियोजनबद्ध रोख प्रवाह (कॅश फ्लो) व्यवस्थापनाचे साधन म्हणून पाहत आहेत. लहान-मोठ्या आर्थिक गरजांसाठी गोल्ड लोनचा वापर वाढत असल्याचे चित्र आहे.
सोने तारण ठेवण्यामागील कारणे
- सोन्याच्या किमती वाढल्यामुळे त्याच दागिन्यांवर पूर्वीपेक्षा जास्त रकमेचे कर्ज मिळत आहे.
- सोने विक्री न करता, केवळ तारण ठेवून आवश्यक निधी मिळतो; त्यामुळे गुंतवणूक सुरक्षित राहते.
- गोल्ड लोनची प्रक्रिया जलद असल्याने अचानक पैशांची गरज भासल्यास हा सोपा पर्याय ठरतो.
- MSME, दुकानदार आणि शेतकरी कॅश फ्लो सांभाळण्यासाठी गोल्ड लोन घेत आहेत.
- घरगुती खर्च, शिक्षण आणि वैद्यकीय खर्च वाढल्यामुळे अतिरिक्त निधीसाठी हा मार्ग निवडला जात आहे.
- कागदपत्रांची प्रक्रिया तुलनेने कमी असल्याने कर्ज लवकर मंजूर होते.
- कर्जफेड केल्यानंतर दागिने त्वरित परत मिळतात, त्यामुळे जोखीम कमी वाटते.
सावकारांऐवजी बँका आणि NBFC कडे कल
पूर्वी लोक अडचणीमुळे गोल्ड लोन घेत असत; मात्र आता ते सुरक्षित आणि नियोजित आर्थिक पर्याय म्हणून स्वीकारले जात आहे. पारदर्शकता, ग्राहक संरक्षण आणि स्पष्ट नियमांमुळे लोक अनौपचारिक सावकारांऐवजी NBFC आणि बँकांकडे वळत आहेत.
अहवालात नमूद करण्यात आले आहे की भारतातील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात सोने साठवलेले असते, जे निष्क्रिय राहते. अशा परिस्थितीत सोने विक्री न करता त्यावर कर्ज घेऊन गरजा भागवण्याची प्रवृत्ती वाढत आहे. परिणामी गोल्ड लोनची व्याप्ती आणि वाढ दोन्ही झपाट्याने वाढताना दिसत आहेत.
