किरण काटकर यांनी सांगितले की, MBA शिक्षण घेण्यासाठी ते सांगली जिल्ह्यातील छोट्या गावातून पुण्यात आले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एका वर्षभर बारा हजारांच्या पगारावर नोकरी केली, पण मनात कायम व्यवसाय करण्याचे स्वप्न होतं. मार्ग सापडत नव्हता, मात्र एका घटनेने त्यांना काय व्यवसाय करायचा हे समजले. त्यांच्या आईला आटा चक्की मशीन हवी होती. त्यावेळी त्यांनी त्या मशीनबद्दल माहिती घेतली आणि त्यांच्या इंजिनियर भावाने सांगितले की, ही मशीन आपण बनवू शकतो. त्यावर किरण म्हणाले, तू बनवू शकतो, तर मी विकू शकतो. आणि त्यांनी उत्तम इंडस्ट्रीजची स्थापना केली.
advertisement
सुरुवातीला त्यांनी मार्केटचा आणि मशीनचा अभ्यास करून आटा चक्की आणि इतर मशीन बनवायला सुरुवात केली आणि त्यांच्या जिल्ह्यातच विक्री करण्यास सुरुवात केली. पुढे हा व्यवसाय जिल्ह्याबाहेर नेण्यासाठी ते पुण्यात आले. पुण्यात त्यांनी रस्त्यावर आपल्या मशीनची विक्री केली आणि तिथून छोटंसं गाळा घेतला. त्या गाळ्यात त्यांनी मशीनची विक्री सुरू केली, आणि ग्राहकांचा प्रतिसाद चांगला मिळत गेला. नंतर त्यांनी एका ठिकाणी स्थायी जागा घेऊन सगळी मशिनरी ठेवली, पण पावसामुळे त्यांच्या सर्व मशिनरी वाहून गेल्या. या घटनेत त्यांना जवळपास 50 ते 60 लाखांचे नुकसान सहन करावे लागले.
हार न मानता त्यांनी पुन्हा शून्यातून व्यवसाय उभा केला. आज त्यांच्या व्यवसायाचे नाव भारतभर ओळखले जाते. रस्त्यावर मशीन विक्री केलेल्या व्यवसायाचा आजचा टर्नओव्हर जवळपास 20 कोटी रुपये आहे.