'धड भाषणही देता येत नाही, पार्थ पवार vs काँग्रेसचा वाद चिघळला, काँग्रेसची खोचक टीका
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने आकाश मोरे उतरवल्याने सुनेत्रा व पार्थ पवार नाराज, पार्थच्या टीकेला काँग्रेसचे जळजळीत ट्वीट, वडिलांच्या अपघाताचा मुद्दा पुन्हा तापला
बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सुनेत्रा पवारांची विनंती धुडकावून लावत काँग्रेसने आकाश मोरे यांना मैदानात उतरवलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात आता नवीन राजकारण सुरू झालं आहे. काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस बारामतीमध्ये अटीतटीची लढत होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. इतकंच नाही तर पार्थ पवार आणि काँग्रेस यांच्यात एकमेकांवर टीका करणं सुरू झालं आहे. पार्थ पवार यांनी काँग्रेसवर टीका केल्यानंतर त्याला काँग्रेस पक्षाकडून ट्वीट करून जळजळीत उत्तर दिलं.
सुनेत्रा पवारांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून पाठिंब्याची गळ घातली होती. मात्र, दिल्लीतील हायकमांडने उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने पार्थ पवार चांगलेच संतापले. पण त्यांच्या याच संतापाला आता काँग्रेसने अत्यंत धारदार शब्दांत प्रत्युत्तर दिलं.
नेमकं काय म्हणाले पार्थ पवार?
काँग्रेसने उमेदवार उभा केल्यावर पार्थ पवार यांनी थेट काँग्रेसच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. "एवढ्या जुन्या आणि मॅच्युअर पक्षाने असा निर्णय घेणं चुकीचं आहे. लोकांच्या मनात दादांबद्दल जे प्रेम आहे, ते काँग्रेस विसरली आहे. हा काँग्रेसच्या महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात आहे," अशा शब्दांत पार्थ यांनी आपला संताप व्यक्त केला. "आम्ही आता कोणाला फोन करणार नाही, जे नशिबात असेल त्याला सामोरं जाऊ," असा इशाराही त्यांनी दिला.
advertisement
काँग्रेसचं बोचरी टीका आणि 'त्या' अपघाताचा उल्लेख
पार्थ पवारांच्या डाऊनफॉल शब्दामुळे काँग्रेस पक्षातल्या नेत्यांना चांगल्याच मिरच्या झोंबल्या. महाराष्ट्र काँग्रेसने अधिकृत ट्विटर हँडलवरून पार्थ पवारांवर बोचरी टीका केली. "धड भाषणही करता न येणाऱ्या आणि केवळ कुटुंबाच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने काँग्रेसच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं म्हणजे अतिच झालं," असं ट्विट काँग्रेसनं केलं.
इतक्यावरच न थांबता काँग्रेसने अजित पवारांच्या 'त्या' संशयास्पद अपघाताचा मुद्दा पुन्हा उकरून काढला. "स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर जमीन घोटाळ्याच्या चौकशीतून वाचण्यासाठी महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने काँग्रेसबद्दल न बोललेलंच बरं," असं म्हणत काँग्रेसने थेट वर्मी घाव घातला आहे.
advertisement
"आधी वडिलांना न्याय मिळवून द्या!"
कर्नाटक सरकारने या अपघाताबाबत FIR नोंदवला आहे कारण तिथे काँग्रेसचं सरकार आहे. "बारामतीचे आमचे उमेदवार सांगतायत की, त्या अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, मी माघार घेतो. यावर पार्थ का बोलत नाहीत?" असा रोकडा सवाल काँग्रेसने विचारला आहे.
पार्थ पवारांनी दिलेल्या 'इशारा' आणि काँग्रेसने दिलेल्या 'जळजळीत उत्तरा'मुळे बारामतीची ही पोटनिवडणूक आता केवळ उमेदवारांची उरलेली नाही, तर ती अस्तित्वाची लढाई बनली आहे. वडिलांच्या मृत्यूच्या तपासावरून काँग्रेसने केलेला वैयक्तिक हल्ला पार्थ पवार कसा परतवून लावणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 07, 2026 9:57 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'धड भाषणही देता येत नाही, पार्थ पवार vs काँग्रेसचा वाद चिघळला, काँग्रेसची खोचक टीका










