नेस्ले या स्विस बहुराष्ट्रीय कंपनीने मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) लॉरेंट फ्रिक्से यांची हकालपट्टी केली आहे. कंपनीच्या अंतर्गत चौकशीत असे आढळले की, त्यांनी एका कनिष्ठ कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध ठेवले होते आणि त्याची माहिती कंपनीला दिली नव्हती. हे कृत्य कंपनीच्या आचारसंहितेचे उल्लंघन करणारे असल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. फ्रिक्से यांच्या जागी फिलिप नवराटिल यांची तात्काळ नेमणूक करण्यात आली आहे.
advertisement
लॉरेंट फ्रिक्से कोण आहेत?
63 वर्षीय फ्रिक्से यांनी नेस्लेमध्ये चार दशके काम केले. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात किराणा दुकानांसोबत करार वाटाघाटी करण्यापासून केली होती. हळूहळू ते कंपनीच्या उच्च पदांवर पोहोचले. 1 सप्टेंबर 2024 रोजी त्यांची सीईओ म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांनी उल्फ मार्क श्नाइडर यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. नेमक्या एका वर्षाने म्हणजेच 1 सप्टेंबर 2025 रोजी चौकशीनंतर त्यांचा कार्यकाळ अचानक संपुष्टात आला.
नेस्लेचे अधिकृत निवेदन
फ्रिक्से यांच्या गैरवर्तनाची चौकशी नेस्लेचे अध्यक्ष पॉल बुल्के आणि प्रमुख स्वतंत्र संचालक पाब्लो इस्ला यांनी केली. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे, लॉरेंट फ्रिक्से यांचे पद सोडणे हे एका अंतर्गत चौकशीनंतर झाले आहे. चौकशीत असे आढळले की, त्यांनी एका थेट कनिष्ठ कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध ठेवले होते. ज्यामुळे नेस्लेच्या व्यवसाय आचारसंहितेचे उल्लंघन झाले.
या निर्णयाला 'अपरिहार्य' (unavoidable) असल्याचे पॉल बुल्के यांनी सांगितले. ते म्हणाले- हा एक आवश्यक निर्णय होता. नेस्लेची मूल्ये आणि प्रशासन आमच्या कंपनीचा भक्कम पाया आहेत. मी लॉरेंट यांचे नेस्लेतील अनेक वर्षांच्या सेवेबद्दल आभार मानतो.
संबंध कसे उघडकीस आले?
बीबीसीच्या वृत्तानुसार ही बाब नेस्लेच्या अंतर्गत व्हिसलब्लोइंग चॅनेलद्वारे (अंतर्गत तक्रार प्रणाली) उघडकीस आली. त्यानंतर कंपनीने तातडीने चौकशी सुरू केली. संबंधित कनिष्ठ कर्मचाऱ्याची ओळख उघड झालेली नाही. मात्र ते कार्यकारी मंडळाचे सदस्य नव्हते, असे बीबीसीने नमूद केले आहे.
फायनान्शियल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या संबंधांबाबतची चिंता या वर्षाच्या सुरुवातीलाच व्यक्त करण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या पहिल्या अंतर्गत चौकशीत हे आरोप निराधार असल्याचे सांगून फेटाळण्यात आले होते. परंतु अतिरिक्त तक्रारी दाखल झाल्यानंतर नेस्लेने बाहेरील वकिलांमार्फत दुसरी चौकशी केली. या दुसऱ्या चौकशीत आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याची पुष्टी झाली.
कोणतीही नुकसानभरपाई नाही
नेस्लेने फ्रिक्से यांना त्यांच्या अल्प कालावधीच्या सीईओ पदासाठी नेमकी किती भरपाई दिली हे जाहीर केले नाही. त्यांचे आधीचे सीईओ उल्फ मार्क श्नाइडर यांना वार्षिक 9.6 दशलक्ष स्विस फ्रँक (सुमारे 11.9 दशलक्ष डॉलर्स) पगार मिळत होता. फ्रिक्से यांनाही असेच पॅकेज मिळण्याची अपेक्षा होती.
2024 च्या नेस्लेच्या भरपाई अहवालानुसार, फ्रिक्से यांच्याकडे 41,000 हून अधिक नेस्ले शेअर्स होते. ज्यांचे मूल्य सुमारे 3.6 दशलक्ष डॉलर्स होते. मात्र बीबीसीच्या वृत्तानुसार पदावरून बडतर्फ करण्यात आल्यामुळे त्यांना कोणतीही एक्झिट पॅकेज (नोकरी सोडताना मिळणारी भरपाई) दिली जाणार नाही.
उच्च पदावरून दुर्मिळ बडतर्फी
फ्रिक्से यांची ही अचानक बडतर्फी नेस्लेसारख्या मोठ्या आणि जागतिक स्तरावर उपस्थित असलेल्या स्विस बहुराष्ट्रीय कंपनीच्या उच्च अधिकाऱ्याला पदावरून काढल्याची दुर्मिळ घटना आहे. 150 वर्षांपेक्षा जास्त इतिहासा असलेल्या या कंपनीसाठी हा निर्णय कॉर्पोरेट प्रशासनाचे कठोर पालन आणि जागतिक कंपन्यांमधील कामाच्या ठिकाणी असलेल्या संबंधांवर वाढलेल्या तपासणीचे महत्त्व अधोरेखित करतो.