आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे टेक्निकल हेड धर्मेश शाह यांनी आशा व्यक्त केली आहे की निफ्टी 50 इंडेक्स आगामी तिमाहीत नवा उच्चांक गाठू शकतो. बाजारातील सुधारलेली गती पाहता निफ्टी येत्या काही आठवड्यांत 25,500 पर्यंत वाढू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. धर्मेश शाह यांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत 24,400 चा स्तर निफ्टीसाठी एक मजबूत आधारस्तंभ म्हणून काम करत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी प्रत्येक घसरणीवर खरेदीची रणनीती अवलंबायला हवी.
advertisement
डिफेन्स सेक्टरमध्ये...
धर्मेश शाह यांनी पुढे सांगितले की, गेल्या काही काळापासून संरक्षण क्षेत्रातील (Defence Sector) शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे भू-राजकीय तणावांमध्ये झालेली वाढ. त्यामुळे या आठवड्यात आलेल्या मोठ्या तेजीनंतर आता या शेअर्समध्ये सामान्य नफावसुली होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निफ्टी नवीन विक्रम करणार?
धर्मेश शाह म्हणाले, 2002पासूनच्या ऐतिहासिक आकडेवारीवर नजर टाकल्यास, स्ट्रक्चरल बुल मार्केटमध्ये सरासरी 18 टक्क्यांपर्यंत (2004 आणि 2006 वगळता) करेक्शन दिसून आले आहे. वेळेच्या दृष्टीने अशा करेक्शनचा कालावधी 8 ते 9 महिन्यांचा राहिला आहे. गेल्या सात महिन्यांत 17 टक्क्यांची घसरण झाल्यानंतर आता निफ्टी वेळ आणि किंमत या दोन्ही दृष्टीने करेक्शनच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
इतकेच नव्हे तर 52 आठवड्यांच्या ईएमए (EMA) जवळ झालेली खरेदी ऐतिहासिकदृष्ट्या पुढील 12 महिन्यांत सरासरी 23 टक्के रिटर्न देत आली आहे. तर कमाल घसरण सरासरी 6 टक्के राहिली आहे. सध्याच्या परिस्थितीतही इंडेक्सने हाच ट्रेंड दाखवला आहे. ते म्हणाले, या सर्व आकडेवारीचा विचार केल्यास आम्हाला अपेक्षा आहे की निफ्टी आगामी तिमाहीत एक नवीन उच्चांक गाठू शकेल.
आगामी आठवड्यासाठी ट्रेडिंग रणनीती
धर्मेश शाह यांनी सांगितले की, निफ्टीने गेल्या तीन आठवड्यांची 23,200-24,500 ची रेंज तोडून एक मजबूत ब्रेकआउट दर्शवला आहे. ज्यामुळे बाजारातील गती अधिक वाढली आहे. ब्रॉडर मार्केटमधील सहभागही मजबूत होत आहे. आमचा अंदाज आहे की येत्या काही आठवड्यांत निफ्टी 25,500 पर्यंत जाऊ शकतो. अशा स्थितीत प्रत्येक घसरणीवर खरेदी करणे हाच योग्य निर्णय असेल.
