चंदीगड: एका औषधनिर्मिती कंपनीच्या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या निमित्ताने तब्बल 51 आलिशान गाड्या भेट दिल्या आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओत दिसणारे व्यक्ती म्हणजे MITS ग्रुपचे संस्थापक आणि चेअरमन एम. के. भाटिया आहेत. जे आपल्या कर्मचाऱ्यांना महागड्या स्कॉर्पिओ SUV गाड्यांच्या चाव्या देताना दिसतात. कंपनीच्या चंदीगड केंद्रावर भव्य दिवाळी साजरी करण्यात आली आणि त्यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आलिशान SUV गाड्या देऊन सन्मानित करण्यात आले. भाटिया यांनी यापूर्वीही दिवाळीच्या शुभ प्रसंगी आपल्या कर्मचाऱ्यांना विविध आकर्षक वाहनांची भेट दिली होती.
advertisement
दिवाळीचा गिफ्ट आणि दिवाळखोरीतून उभारी
MITS ग्रुपचे मालक भाटिया यांनी दिवाळखोरीतून उभारी घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांना गाड्या देण्याचा निर्णय घेतला, आणि त्यांच्या या उदार वृत्तीचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या कृतीतून त्यांच्या नम्र स्वभावाचं आणि कर्मचाऱ्यांबद्दलच्या कृतज्ञतेचं दर्शन घडतं.
अहवालानुसार 2002 मध्ये भाटिया यांच्या मेडिकल स्टोअरला मोठे नुकसान झाल्याने ते दिवाळखोर झाले होते. परंतु त्यांनी हार न मानता प्रयत्न सुरू ठेवले आणि 2015 मध्ये MITS कंपनी स्थापन करून नव्या यशाचा अध्याय सुरू केला. आज त्यांच्या नावावर तब्बल 12 कंपन्या कार्यरत आहेत.
सोशल मीडियावरील प्रतिक्रिया
जोपर्यंत तुम्ही गुणवत्तेची तडजोड न करता औषधनिर्मितीतून नफा कमावत आहात, तोपर्यंत त्या नफ्यातून कर्मचाऱ्यांना गाड्या, बंगल्यांसारख्या भेटी देण्यात काही गैर नाही. पण जर नफा गुणवत्तेशी छेडछाड करून मिळवला असेल, तरच समस्या आहे. - असे एका युझरने म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युझरने संशय व्यक्त केला- काय माहीत, या गाड्यांच्या ईएमआय कर्मचाऱ्यांच्या पगारातूनच वजा केल्या जातील का? (‘आणि हा भाग कधीच बातम्यांमध्ये येणार नाही’).
कर्मचाऱ्यांच्या आनंदाला नवा आयाम
MITS ग्रुपच्या संस्थापकाची ही दिवाळी गिफ्ट उद्योगक्षेत्रात चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक मोठ्या कंपन्या आता पारंपरिक पद्धतींपेक्षा पुढे जाऊन आपल्या कर्मचाऱ्यांच्या समाधानासाठी आणि कल्याणासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या आनंदाला कंपनीच्या यशा इतकंच महत्त्व देत असल्याचे मेसेज देत आहेत.
