राहुल पारगोंड हे शिक्षण घेत असताना डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होते. इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरू असतानाच त्यांनी चाकण एमआयडीसी परिसरात फिल्डमध्ये काम करण्याचा अनुभव घेतला. या काळात विविध प्रकारचे लोक, व्यवसायपद्धती आणि ग्राहकांच्या गरजा समजून घेण्याची संधी त्यांना मिळाली. डिलिव्हरी बॉय म्हणून काम करताना व्यवसाय कसा चालतो, ग्राहकांशी कसे वागायचे, वेळेचे नियोजन कसे करायचे हे प्रत्यक्ष शिकायला मिळाले. त्या अनुभवातूनच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा अधिक बळावली, असे राहुल सांगतात.
advertisement
Success Story : नोकरी सांभाळत सुरू केला फूड व्यवसाय, मित्र-मैत्रिणीची जोडी ठरतेय हिट, कमाई तर पाहाच
याच दरम्यान सायली चोरगे यांची राहुल यांच्याशी भेट झाली. सायली या लॅब टेक्निशियन असून त्यांनी नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. मी एकटी मुलगी असल्याने व्यवसाय कसा करणार, हा प्रश्न अनेकांना पडायचा. मात्र राहुलची साथ मिळाल्याने आत्मविश्वास वाढला आणि आम्ही एकत्र कॅफे सुरू करण्याचा निर्णय घेतला, असे सायली सांगतात. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी आल्या. आर्थिक अडथळे, जागेचा प्रश्न आणि कामाचा अनुभव नसणे या सगळ्या गोष्टींना सामोरे जावे लागले. त्या काळात सायली यांनी ऑलिन्टेरिंगचा जॉबही केला.
सुरुवातीला कोथरूड परिसरात हा व्यवसाय सुरू करण्यात आला होता. मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी कॅफे नारायण पेठेत स्थलांतरित करण्यात आला आणि कॅफे ग्रीलिनो या नावाने नव्याने सुरुवात झाली. पिझ्झा, बर्गर, सँडविच, कॉफी यांसारख्या पदार्थांना ग्राहकांची विशेष पसंती मिळत आहे. घरच्यांची साथ आणि ग्राहकांचा वाढता प्रतिसाद यामुळे आज हा व्यवसाय स्थिर होत आहे.
या व्यवसायाच्या माध्यमातून सायली यांना दरमहा सुमारे 80 ते 90 हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली. हा व्यवसाय असाच पुढे नेऊन आणखी वाढवायचा आहे, असा विश्वास राहुल आणि सायली दोघांनीही व्यक्त केला. कॅफे ग्रीलिनोचा हा प्रवास आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.