चंद्रशेखरन यांनी रतन टाटा यांच्या व्यक्तिमत्वाची व्याख्या करताना सांगितले की, `त्यांची भेट घेतल्यानंतर प्रत्येक जण माणुसकी, जिव्हाळा आणि भारतासाठीच्या त्यांच्या स्वप्नांची कथा अनुभवत असे. त्यांच्यासारखी व्यक्ती भेटणं हे अत्यंत दुर्मिळ आहे.` त्यांचे आणि रतन टाटा यांचे संबंध कसे बदलत गेले , याबाबत चंद्रशेखर यांनी सांगितले. ते म्हणाले की, `सुरुवातीच्या काळात त्यांच्याशी प्रामुख्याने उद्योग-व्यवसायाबाबत चर्चा होत असे. ही चर्चा हळूहळू खासगी गोष्टींकडे वळाली. त्यांचीशी चर्चा करताना कारपासून ते हॉटेल्सपर्यंत विविध विषयांवर चर्चा होत. पण जेव्हा जीवनातील सामान्य गोष्टींचा विचार होत तेव्हा रतन टाटा यांची खोल संवेदनशीलता आणि त्यांची निरीक्षण क्षमता अनुभवायला मिळत असे. ही एकमेव व्यक्ती होती जी फक्त वेळ आणि अनुभवाने समजू शकते. `
advertisement
कर्मचाऱ्यांच्या हितासाठी रतन टाटा यांचे समर्पण
एन. चंद्रशेखर यांनी एक घटना शेअर केली. त्यावेळी त्यांनी रतन टाटा कर्मचाऱ्यांप्रती किती संवेदनशील होते, हे सांगितले. ते म्हणाले की, `रतन टाटा यांनी कोणताही वाद सोडवण्यावर इतर पद्धतीने लक्ष केंद्रित केले नाही तर कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हिताची काळजी घेतली.` चंद्रशेखरन अध्यक्ष झाल्यावर त्यांना टाटा मोटर्स मधील एक प्रकरण हाताळावे लागले. कर्मचारी संघटना आणि कंपनी यांच्यात दोन वर्षांपासून वेतनाबाबत वाद सुरू होता. मार्च 2017 मध्ये रतन टाटा आणि चंद्रशेखर यांनी एकत्रितपणे संघटनेच्या नेत्यांची भेट घेतली. या भेटीत रतन टाटा यांनी तीन महत्त्वाचे संदेश दिले होते. त्यांनी वाद संपुष्टात आणण्यास उशीर झाल्याबद्दल खेद व्यक्त केला आणि कंपनी अडचणींचा सामना करत असल्याचे निदर्शनास आणून दिले. हा वाद दोन आठवड्यात सोडवला जाईल, असे दोघांनीही आश्वासन दिले.
रतन टाटा यांची जबरदस्त स्मरणशक्ती
रतन टाटा यांची स्मरणशक्ती फोटोग्राफिक होती. हे त्यांचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल. चंद्रशेखरन यांनी या क्षमतेचे कौतुक करताना सांगितले की, `रतन टाटा जर एखाद्या ठिकाणी गेले तर तेथील प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टी (फर्निचरच्या बारीक तुकड्यापासून ते लायटिंग आणि रंगसंगतीपर्यंत) बारकाईने लक्षात ठेवत. पुस्तके आणि मॅगझिनचे कव्हर आणि त्यातील कंटेंट अनेक वर्ष त्यांच्या स्मरणात राहायचा. त्यांचे निरीक्षण आणि गोष्टी समजून घेण्याची क्षमता ही सर्वात मोठ्या कल्पनांपासून ते लहान तपशीलांपर्यंत विस्तारलेली होती.`
रतन टाटा होते निस्वार्थी सेवक
एन. चंद्रशेखर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितलं की, `रतन टाटा यांचे व्यक्तिमत्व हळूहळू समजते. ते आपल्या कर्मचाऱ्यांच्या आणि कंपनीच्या प्रत्येक छोट्या पैलूची मनापासून काळजी घेणारे व्यक्ती होते. कंपनीच्या आर्थिक स्थितीकडे त्यांचे लक्ष होतेच पण कंपनीचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय कसे जगतात याकडे देखील त्यांचे बारीक लक्ष असायचे. या गुण वैशिष्ट्यांमुळे ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात. यामुळे रतन टाटांसारखी दुसरी व्यक्ती नाही,` असं त्यांनी सांगितले.