मुंबई: आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज भासली की लोक प्रामुख्याने सोने तारण ठेवून बँकांकडून कर्ज घेतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? सोन्याप्रमाणेच चांदी ठेवूनही बँक लोन देऊ शकते का? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो आणि आता त्याचे उत्तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नवीन मार्गदर्शक सूचनांमधून स्पष्ट झाले आहे.
advertisement
आरबीआयचा मोठा निर्णय
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेल्या नवीन नियमांनुसार 1 एप्रिल 2026 पासून सर्व बँका आणि नियमनाधीन कर्जदाते (regulated lenders) आता सोनेप्रमाणे चांदीही तारण ठेवून कर्ज देऊ शकतात. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना कर्ज घेण्यासाठी आणखी एक सोपा आणि वैध पर्याय उपलब्ध होणार आहे.
मात्र आरबीआयने काही महत्वाच्या अटी स्पष्ट केल्या आहेत. बँकांना सोने आणि चांदीच्या दागिन्यांवर आणि नाण्यांवरच कर्ज देण्याची परवानगी असेल. पण “प्रायमरी गोल्ड” किंवा “प्रायमरी सिल्वर” (म्हणजे बुलियनच्या स्वरूपातील धातू) यांच्या बदल्यात लोन देण्यास परवानगी नसेल. तसेच आधीच तारण ठेवलेल्या सोने किंवा चांदीला पुन्हा एकदा तारण ठेवता येणार नाही.
बँकांचे धोरण काय आहे?
सध्या अनेक बँका चांदीला कोलॅटरल (Collateral) म्हणून मान्यता देत नाहीत. त्यामुळे त्या चांदीवर आधारित कर्ज देत नाहीत. मात्र काही सहकारी बँका (Co-operative Banks) आणि काही नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या (NBFCs) चांदीच्या तारणावर लोन देतात. आरबीआयच्या या नव्या नियमांनंतर सर्व राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांनाही चांदी तारण ठेवून लोन मंजूर करण्याचा अधिकार मिळणार आहे.
चांदीच्या बारवरही लोन मिळेल का?
आरबीआयच्या नियमानुसार फक्त चांदीचे दागिने आणि नाणी यांच्याविरुद्धच लोन दिले जाऊ शकते. जर कोणी सिल्वर बार, ETF (Exchange Traded Fund) किंवा म्युच्युअल फंड यांच्या बदल्यात कर्ज घेऊ इच्छित असेल, तर त्यावर लोन मंजूर होणार नाही. म्हणजेच गुंतवणूक म्हणून ठेवलेली चांदी किंवा बुलियन स्वरूपातील धातू तारण ठेवता येणार नाही.
आज चांदीचा दर किती?
चेन्नई, हैदराबाद आणि केरळ येथे चांदीचा दर सर्वाधिक आहे- 1,65,000 प्रति किलो.
तर मुंबई, दिल्ली आणि पुणे या शहरांमध्ये चांदीचा भाव थोडा कमी असून 1,54,900 प्रति किलो आहे.
