मुंबई: देशात 2000 रुपयांच्या नोटा बंद होऊन आता दोन वर्षांहून अधिक काळ उलटला असला, तरीही लोकांच्या घरात या नोटांचा साठा अद्याप मोठ्या प्रमाणात आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने नोव्हेंबरमध्ये जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार चलनातून काढून टाकल्यानंतरही एकूण 5,817 कोटी मूल्याच्या 2000 रुपयांच्या नोटा अजूनही लोकांच्या ताब्यात आहेत.
advertisement
या गुलाबी नोटांची कहाणी अजून संपलेली नाही. RBI च्या मते 2000 रुपयांच्या तब्बल 98.37 टक्के नोटा बँकिंग प्रणालीत परत आल्या आहेत. मात्र अजूनही उरलेल्या 1.63 टक्के म्हणजेच सुमारे 5,817 कोटींच्या नोटा लोकांच्या हातात आहेत. ही माहिती 31 ऑक्टोबर 2025 पर्यंतची आहे.
कधी बंद करण्यात आल्या 2000 रुपयांच्या नोटा?
रिझर्व्ह बँकेने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून परत घेण्याची घोषणा केली होती. मात्र या नोटा आजही वैध चलन (Legal Tender) म्हणून मान्य आहेत. RBI ने स्पष्ट केले आहे की 19 मे 2023 रोजी चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य 3.56 लाख कोटी इतके होते. ते आता घटून फक्त 5,817 कोटी रुपये राहिले आहे.
अजूनही कशा जमा करता येतील या नोटा?
7 ऑक्टोबर 2023 पर्यंत सर्व बँक शाखांमध्ये या नोटा जमा किंवा बदलता येत होत्या. आता ही सुविधा केवळ रिझर्व्ह बँकेच्या 19 इश्यू ऑफिसेसमध्ये उपलब्ध आहे. त्याशिवाय नागरिकांना आणखी एक पर्याय दिला आहे. डाकमार्फत (पोस्टाने) या नोटा RBI च्या कोणत्याही इश्यू ऑफिसला पाठवून स्वतःच्या बँक खात्यात जमा करता येतात.
देशभरातील RBI चे 19 इश्यू ऑफिसे आहेत. ही ऑफिसेस अहमदाबाद,बेंगळुरू,बेलापूर (नवी मुंबई),भोपाल,भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर,नवी दिल्ली,पटना आणि तिरुवनंतपुरम या शहरात आहेत.
RBI च्या या आकडेवारीतून स्पष्ट होते की बहुतेक 2000 रुपयांच्या नोटा आता परत बँकिंग प्रणालीत आल्या आहेत. पण काही कोटी रुपयांचा गुलाबी साठा अजूनही देशभरातील लोकांकडे लपलेला आहे.
