बँकेने नेमकं काय म्हटलंय?
स्टेट बँकेने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून याबद्दलची माहिती दिली आहे. "ग्राहकांना अधिक चांगला डिजिटल अनुभव देण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी योनो ॲपच्या देखभालीचे काम नियोजित करण्यात आले आहे. या कालावधीत काही वापरकर्त्यांना लॉग-इन करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो," असे बँकेने स्पष्ट केले आहे. ग्राहकांना होणाऱ्या या त्रासाबद्दल बँकेने दिलगिरीही व्यक्त केली आहे.
advertisement
तुमची कामं कशी होतील?
जर तुम्हाला या काळात तातडीने पैसे पाठवायचे असतील किंवा इतर बँकिंग व्यवहार करायचे असतील, तर गोंधळून जाण्याचं कारण नाही. बँकेने योनो ॲप व्यतिरिक्त इतर पर्यायांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही बँकेची अधिकृत वेबसाईट वापरू शकता. SBI कडे उपलब्ध असलेले इतर डिजिटल चॅनेल्स देखील या काळात सुरू राहतील. याशिवाय एटीएम सेवांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. काहीवेळा इतर अॅपवरही सर्व्हिस डाऊन असा मेसेज येऊ शकतो, त्यामुळे तुमच्याकडे थोडे पैसे काढून ठेवा. नाहीतर तुमचं नुकसान होऊ शकतं.
सावध राहा!
वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने अनेकजण हॉटेल बुकिंग, खरेदी किंवा पार्ट्यांसाठी ऑनलाईन पेमेंटवर अवलंबून असतात. अशा वेळी ऐन मोक्याच्या क्षणी योनो ॲप चाललं नाही तर तुमची पंचाईत होऊ शकते. त्यामुळे शक्य असल्यास आपली महत्त्वाची आर्थिक कामं वेळेत उरकून घ्या किंवा पेमेंटसाठी यूपीआय आणि नेट बँकिंगचा पर्याय तयार ठेवा. बँकेने देखभालीची नेमकी वेळ अद्याप अपडेट केली नसली तरी, रात्रीच्या वेळेस हे काम होण्याची शक्यता जास्त असते. मात्र, तरीही सावधगिरी बाळगलेली कधीही चांगली.
