मुंबई: जर तुम्हाला शेअर बाजारात थोडी जरी आवड असेल, तर तुमच्या मनात एकदा तरी विचार आला असेल – नोकरी का करावी, थेट ट्रेडिंग करून पैसे कमावले तर? पहिल्या नजरेला हे खूप सोपे आणि आकर्षक वाटते. आपले काही सुरुवातीचे ट्रेड यशस्वी झाले तर प्रॉफिटही होतो. मग वाटू लागते की नोकरीपेक्षा ट्रेडिंग करून स्वातंत्र्याचे आयुष्य मिळू शकते. वरून यूट्यूबवर काही ट्रेडर्स मौजमजा करताना दिसतात आणि ते पाहून आपलेही मन डोलते. पण इथेच खरा सापळा आहे.
advertisement
SEBI चे आकडे काय सांगतात?
SEBI च्या आकड्यानुसार F&O (फ्यूचर्स आणि ऑप्शन्स) मध्ये ट्रेड करणाऱ्या 93% रिटेल गुंतवणूकदारांना तोटा होतो. म्हणजेच नोकरी सोडून फुल-टाइम ट्रेडिंग करणे किती धोकादायक आहे, हे स्पष्ट दिसते. नोकरी सोडल्यानंतर स्थिर पगाराचा आधारही संपतो आणि सतत होणारे नुकसान हे कर्ज, तणाव आणि पश्चात्तापात बदलते. अनेक लोकांनी यूट्यूबवर आपली ही कटू सत्यकथा सांगितली आहे.
मार्केटचा सापळा
ट्रेडिंग ही स्थिर नोकरीसारखी नसते. ही जलद गतीची आणि प्रचंड तणावाची दुनिया आहे. अनुभवी आणि अनुशासित लोकही टिकण्यासाठी झगडतात. सुरुवात मात्र एका छोट्या प्रॉफिटपासून होते. उदाहरणार्थ, एखाद्याने एका दिवशी 10,000 किंवा आठवड्यात 50,000 रुपये कमावले. हे नोकरीच्या महिन्याच्या पगारापेक्षा जास्त भासते. मग आपले गणित सुरू होते – पार्ट-टाइममध्ये इतकं मिळत असेल तर फुल-टाइममध्ये किती मिळेल!
यातून खरा धोका सुरू होतो. बाजार सुरुवातीला इतकंच देतो की माणसाला वाटतं की त्याने पैसे कमावण्याचा फॉर्म्युला शोधला आहे. पण हे भ्रम लवकरच तुटतात.
नुकसान झालं की दुप्पट पैसे लावण्याची सवय
बाजारातील अचानक घडामोडी – एखादी बातमी, ग्लोबल बदल, किंवा सामान्य चढउतार – मोठा तोटा करून जातात. अशा वेळी बॅकअप इनकम नसल्याने प्रत्येक ट्रेड म्हणजे घरखर्च, भाडं, रेशनसारखा वाटतो. विचार करण्याची क्षमता कमी होते आणि लोक जास्त रिस्क घेऊ लागतात. तोटा झाल्यावर दुप्पट पैसे लावून कव्हर करण्याचा प्रयत्न होतो. पण उलट तोटे वाढत जातात.
ताण, तोटा आणि तुटलेले नाते
हळूहळू ट्रेडिंग अकाउंट रिकामं होतं – 2 लाखांचं भांडवल कमी होऊन 1 लाख, मग 60 हजार आणि शेवटी 10 हजार उरतं. सततचा ताण, जागरणं, कुटुंबाशी दुरावा, नातेसंबंध बिघडणे हे सुरू होतं. काही लोक तर दागिने गहाण ठेवतात. SEBI च्या आकड्यांनुसार गेल्या 3 वर्षांत रिटेल गुंतवणूकदारांनी F&O मध्ये तब्बल 1.8 लाख कोटी रुपये गमावले आहेत.
नोकरी का गरजेची?
नोकरी फक्त पगार देत नाही तर सुरक्षा आणि अनुशासनही देते. ट्रेडिंग मात्र हे सगळं हिरावून घेते आणि त्याबदल्यात फक्त अनिश्चितता देते. त्यामुळे जर ट्रेडिंग करायचं असेल तर ते साईड अॅक्टिव्हिटी ठेवा. फक्त इतकेच पैसे गुंतवा, जे गमावले तरी आयुष्यावर परिणाम होणार नाही. हे लक्षात ठेवा की 10 पैकी 9 लोक यात हरतात. नोकरी सोडून फुल-टाइम ट्रेडिंग करणे म्हणजे करिअरचा निर्णय नाही तर आर्थिक जुगार आहे.
एक्सपर्ट काय म्हणतात...
पोरिन्जू वेलियाथ (Value Investing Expert): 90% लोक ट्रेडिंगमध्ये अपयशी होतात कारण ते तयारीशिवाय नोकरी सोडतात. फुल-टाइम ट्रेडिंगसाठी किमान 5 वर्षांचा पार्ट-टाइम अनुभव आणि आपत्कालीन फंड हवा.
नितीन कामत (Zerodha): जर तुमची तयारी चांगली नाही आणि आर्थिक सुरक्षा नाही तर फक्त ट्रेडिंगवर अवलंबून राहणे धोकादायक आहे.
राकेश झुनझुनवाला: ट्रेडिंगसाठी अनुशासन आणि धैर्य महत्त्वाचे. नोकरी सोडून घाईघाईत ट्रेडिंग सुरू करणे खतरनाक. आधी पार्ट-टाइम ट्रेडिंग करून अनुभव घ्या.
राधाकृष्णन दमानी (D-Mart Founder): गुंतवणूक म्हणजे मॅरेथॉन. फुल-टाइम ट्रेडिंग करण्याआधी इतकी भांडवल असायला हवी की 1-2 वर्षांचा खर्च निघेल.
अजीम प्रेमजी (Wipro Founder): ज्ञान आणि अनुशासनाशिवाय बाजारात यश नाही. सलग 2-3 वर्षे नफा नसेल तर नोकरी सोडू नये.
नारायण मूर्ती (Infosys Co-Founder): पैसा कमावणं ही धीमी प्रक्रिया आहे. घाईत घेतलेले निर्णय घातक असतात. आधी नोकरीचा अनुभव आणि आर्थिक सुरक्षितता मिळवा.